सातारा : स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कार्य कक्षा रुंदावल्या असून महामंडळाने वर्षभरात दहा हजार लाभार्थ्यांची संख्या ओलांडली आहे. तसेच यातील अनेक लाभार्थ्यांना उद्योजक म्हणून अर्थसाहाय्य करण्यात आले आहे, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी जिल्हा समन्वयक मयुरेश घोरपडे उपस्थित होते. पाटील पुढे म्हणाले, मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या अविकसित असणाऱ्या तरुणांसाठी तरुणींसाठी स्वयंपूर्णतेची वाटचाल म्हणून अण्णासाहेब पाटील महामंडळाला विशेष ताकद अनुदानाच्या रूपाने देण्यात आली. या अनुदान प्रक्रियेमध्ये सहकारी बँकांनी मोठ्या प्रमाणावर मदत केली आहे. आत्तापर्यंत गेल्या वर्षभरात लाभार्थ्यांचा आकडा दहा हजाराच्या पुढे गेला आहे. या लाभार्थ्यांना आतापर्यंत ९८० कोटी रुपयांची मदत करण्यात आली. वेगवेगळ्या व्यवसायानिमित्त १५ ते ७५ लाखापर्यंत मध्यम आणि लघुउद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी मदत करण्यात आली. यामध्ये अत्यंत सोपे, सुटसुटीत नियम आणि मोजक्याच कागदपत्रांच्या माध्यमातून अनुदान दिले जात आहे. तसेच या प्रक्रियेत सुटसुटीतपणा आणून राष्ट्रीयीकृत बँकांना या प्रक्रिया सहभागी करून घेण्यात आले आहे.
काही बँका जर अनुदान प्रक्रियेला मदत करत नसतील तर त्यांच्या बैठका घेऊन त्यांना त्या पद्धतीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या पुढील वर्षाचे टार्गेट हे पंधराशे कोटी रुपये आहे. त्या दृष्टीने आतापासूनच आराखडा तयार केला जात असून दहा हजारपेक्षा अधिक लाभार्थी पुढील वर्षी करणार असल्याचे जिल्हा समन्वयक मयुरेश घोरपडे यांनी सांगितले आहे.