हिमालय, सिक्कीम भागातून येणारे थंड वारे दक्षिणेतून महाराष्ट्रात लातूर, उस्मानाबादमार्गे प्रवेश करतात. या वाऱ्याचे तापमान उणे २५ सेल्सिअसपेक्षा कमी आहे. त्यामुळे पाऊस संभवतो. अवकाळी पावसाचा शेतीवर मोठय़ा प्रमाणात परिणाम होत आहे. तसेच प्राण्यांनाही यापासून धोका आहे. वातावरणातील या बदलांमुळे यंदा मान्सूनचे आगमन लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे खरीप पिकांच्या पेरणीवर विपरित परिणाम होण्याची भीती पुणे येथील हवामानशास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केली.
उस्मानाबाद जिल्हय़ातील गुंजेवाडी, कौडगाव, वडगावकाटी भागात रविवारी रात्री वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. लातूर जिल्हय़ाच्या अनेक गावांत जोरदार पाऊस झाला. मराठवाडय़ात अवकाळी पाऊस व गारपिटीने १४ बळी घेतले. मार्चनंतर एप्रिलमध्येही गारपिटीचे संकट आल्यामुळे गावोगावचे शेतकरी चांगलेच चिंताक्रांत झाले आहेत. याच वेळी हवामान विभागाचे जागतिक अहवाल व भारतातील शास्त्रज्ञांकडूनही आगामी काळात विचित्र हवामानाला सामोरे जावे लागण्याचे संकेत मिळत आहेत. या पाश्र्वभूमीवर डॉ. साबळे यांनी महाराष्ट्रात सलग दुसऱ्या महिन्यात होत असलेली गारपीट हवामान बदलाचे वाईट चिन्ह असल्याचे ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले.
मार्च-एप्रिल महिन्यात यापूर्वी अवकाळी पाऊस झाला. मात्र, सलग दुसऱ्या महिन्यात झालेली गारपीट चिंतेची बाब ठरली आहे. येत्या  तीन-चार दिवसांत पुन्हा जोरदार पावसाची शक्यता त्यांनी वर्तवली.
संयुक्त राष्ट्रसंघातील ‘इंटरनॅशनल पॅनल ऑन क्लायमेट चेंज’ हा हवामान बदलाविषयीचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. जगभरात या अहवालाची प्रतीक्षा केली जाते. जगभरातील विविध देशांचे ३०९ लेखक सुमारे ७० हजार पेपरचा अभ्यास करून हा अहवाल प्रसिद्ध करतात. या वर्षी हवामान बदलाचे परिणाम सर्वच देशांना भोगावे लागणार आहेत. भारतात विदर्भ व मराठवाडय़ाला याचा मोठा फटका सहन करावा लागणार असल्याचे अहवालात म्हटले आहे. या वर्षी पाऊसमानात मोठे बदल होतील. पावसाळय़ात पावसाचा ताण देणारा कालावधी अधिकचा असेल व कमी काळात अधिक पाऊस पडण्याचे प्रमाण वाढणार असल्याचे यात म्हटले आहे. मार्चमध्ये सोलापूर जिल्हय़ातील माढा येथे झालेला २०८ मिमी पाऊस, कुर्डुवाडीत १५४ मिमी, लातूरच्या औसा तालुक्यातील लामजना व किल्लारी परिसरात पडलेला पाऊस, निलंगा तालुक्यातील निटूर व रेणापूर तालुक्यातील पानगाव, कारेपूर परिसरात झालेला पाऊस, शिवाय परभणी, अकोला, वर्धा येथील पाऊस गेल्या १०० वर्षांत एवढय़ा मोठय़ा प्रमाणात झालेला पहिलाच मोठा पाऊस असल्याचे अहवालात म्हटले आहे.
हैजराबाद येथील इक्रिसॅट संस्थेने २०१२-१३ मध्ये मराठवाडा व विदर्भात हवामानामध्ये अतिरेकी बदल होतील, असे सांगितले होते. या संस्थेमार्फत कोरडवाहू पिकांवर नेमके काय परिणाम होतील? यासंबंधीची माहिती प्रकाशित केली जाते. ज्वारी, तूर, सोयाबीन, ऊस या पिकांची उत्पादकता किमान १० टक्क्यांनी घटेल, असे त्यांनी म्हटले होते. सहा वर्षांपूर्वी (२००८) केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना हवामान बदलास सामोरे जाण्यासाठी राज्य सरकार कोणती तयारी करीत आहे, याचा अहवाल ३१ मार्च २०१४ पर्यंत पाठवण्याचे आदेश दिले होते. मात्र, केवळ ९ राज्यांनी अहवाल सादर केला. अर्थातच, या ९ राज्यांत महाराष्ट्राचा समावेश नाही. राज्य सरकारकडे हवामान बदलाचे खाते नाही. त्यामुळे हवामान बदलासंबंधी अद्ययावत माहितीची यंत्रणाच कार्यरत नाही. त्यासाठी लागणारी गुंतवणूक लघु व दीर्घ मुदतीचे अंदाज देणारे रडार बसवले गेले पाहिजेत. मात्र, निवडणुकीच्या धामधुमीत याची चिंता कोणालाही नाही.
लातूर जिल्हय़ात सोयाबीनचा पेरा देशात दुसऱ्या क्रमांकाचा आहे. ८० टक्के शेतकरी खरीप हंगामात सोयाबीनचे पीक घेतात. मृग नक्षत्र सुरू होण्यास दीड महिना बाकी आहे. मान्सूनमध्ये बदल झाला व पेरण्या लांबल्यास सोयाबीनचे पीक घेता येईल की नाही? या चिंतेने शेतकरी त्रस्त आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा