Maharashtra Breaking News Live Updates, 02 January 2023 : मोदी सरकारने २०१६ साली घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने आज मोठा निकाल दिला. केंद्र सरकारने घेतलेला नोटबंदीचा निर्णय वैधच आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. केंद्र सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या एकूण ५८ याचिकांवर सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

दरम्यान, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी भाजपा नेते किरीट सोमय्यांनी आक्रमक होत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. कोर्लई येथे रश्मी ठाकरे यांचे १९ बंगले होते. मात्र, आता हे बंगले गायब आहेत, याची चौकशी करावी, अशी मागणी सोमय्यांनी केली होती. तसेच याप्रकरणी सोमय्यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली. दरम्यान, या आरोपाला उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. किरीट सौमय्यांनी आधी मुख्यमंत्र्यांच्या सहा बंगल्यावर बोलावं असे त्या म्हणाल्या. हा विषय सुद्धा दिवसभर चर्चेत राहण्याची शक्यता आहे.

Live Updates

Marathi Batmya Today, 02 January 2023 : वाकडेवाडी एसटी स्थानकात ज्येष्ठ महिलेचे दोन लाखांचे दागिने लंपास

 
18:01 (IST) 2 Jan 2023
सिमेंट पाइप तयार करणाऱ्या कंपनीच्या हौदात पडून दोन वर्षांच्या बालिकेचा मृत्यू, कात्रज भागातील दुर्घटना

पुणे : कात्रज भागात सिमेंटचे पाइप तयार करणाऱ्या कंपनीतील पाण्याच्या हौदात पडून दोन वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. सुरभी विमलकुमार गौतम (वय २) असे मृत्युमुखी पडलेल्या बालिकेचे नाव आहे.

सविस्तर वाचा...

17:48 (IST) 2 Jan 2023
कल्याणमध्ये गौरीपाडा येथे विकासकांकडून विकासकाची फसवणूक ; गुन्हा दाखल

कल्याण- कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा येथे दोन विकासक संस्थांकडून एका विकासक संस्थेला ठरलेल्या नोंदणी कराराप्रमाणे बांधकामाचा ठरलेला मोबदला न देता फसवणूक केली. याशिवाय कल्याण डोंबिवली पालिकेच्या नगररचना विभागाने इमारत १२ माळ्याची उभारण्यास परवानगी दिली होती. तरीही विकासकांनी सहा वाढीव बेकायदा माळे बांधले.

सविस्तर वाचा…

17:47 (IST) 2 Jan 2023
ठाण्यात भाजप-शिंदे गटातील संघर्ष अधिक तीव्र; भाजपचे शिष्टमंडळ पोलीस आयुक्तांच्या भेटीला

ठाणे : कशीश पार्क येथे फलक बसविण्यावरून भाजपच्या पदाधिकाऱ्याला मारहाण झाली होती. याप्रकरणी निष्पक्षपणे तपास करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांच्याकडे केली. तसेच त्यांना निवेदनही देण्यात आले. त्यामुळे ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. सविस्तर वाचा…

17:46 (IST) 2 Jan 2023
मुंबई : विस्तारीत सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्ता प्रकल्प; वाकोला आणि बीकेसीतील वाहतूक कोंडी लवकरच फुटणार

सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्ता प्रकल्पांतर्गत बांधण्यात येत असलेल्या कुर्ला ते वाकोला आणि भारत डायमंड बोर्स ते वाकोला उन्नत मार्गाच्या कामाला अखेर वेग देण्यात आला आहे. अनेक कारणांनी हा प्रकल्प रखडला असून या नव्या वर्षात मात्र हा प्रकल्प सुरू करण्याचे उद्दिष्ट मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ठेवले आहे. सविस्तर वाचा…

17:45 (IST) 2 Jan 2023
मुंबई : घाटकोपर स्थानकात प्रवाशांच्या प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीचा धोका

मध्य रेल्वेच्या घाटकोपर स्थानकातील मधल्या मोठया पादचारी पुलावर सकाळी आणि सायंकाळी होणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीमुळे चेंगराचेंगरीचा धोका निर्माण झाला आहे. सोमवारी कामाच्या पहिल्याच दिवशी सकाळी मोठया गर्दीला प्रवाशांना सामोरे जावे लागले. घाटकोपर मेट्रो स्थानकाकडे जाण्यासाठी रेल्वे प्रवाशांची गर्दी होत असून या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि नियोजनासाठी मध्य रेल्वेकडून, किंवा मेट्रो प्रशासनानेही ठोस निर्णय घेतलेला नाही. सविस्तर वाचा…

17:44 (IST) 2 Jan 2023
धारावी पुनर्विकास प्रकल्पात माहीम निसर्ग उद्यानाचा समावेश नाही; प्रकल्प प्राधिकरणाची उच्च न्यायालयात माहिती

धारावी पुनर्विकास प्रकल्पात माहीम निसर्ग उद्यानाचा समावेश नसेल, असे धारावी पुनर्विकास प्रकल्प प्राधिकरणातर्फे सोमवारी उच्च न्यायालयात सांगण्यात आले. मात्र विकास आराखड्यात या आरक्षित वन क्षेत्राबाबत बदल करण्यात आल्यास तो सरकारचा निर्णय असेल, असेही प्राधिकरणातर्फे न्यायालयाला सांगण्यात आले. सविस्तर वाचा…

17:19 (IST) 2 Jan 2023
नववर्षाच्या सुरूवातीलाच शहरात घरफोड्यांचे सत्र, कोथरूड, सिंहगड रस्ता भागात घरफोडी; ६४ लाखांचा ऐवज लंपास

पुणे : नववर्षाच्या सुरुवातीला शहरात घरफोड्यांचे सत्र कायम आहे. कोथरूडमध्ये व्यावसायिकाच्या सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील दागिने, रोकड असा ४१ लाख १६ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. सिंहगड रस्ता भागातही सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी २३ लाख ५३ हजार ८०० रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली.

सविस्तर वाचा...

17:14 (IST) 2 Jan 2023
मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला, जे.पी.नड्डा यांचा आरोप

शौर्य व विरतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांनी केवळ मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी भारतीय जनता पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसला, असा आरोप भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघात यश मिळावे यासाठी नड्डा यांनी न्यू इंग्लिश हायस्कूलच्या क्रीडांगणावर ‘विजय संकल्प’ जाहीर सभेच्या माध्यमातून प्रचाराचा नारळ फोडला.

सविस्तर वाचा

16:37 (IST) 2 Jan 2023
माजी नगरसेवक प्रकाश मलशेट्टी यांचा ‘बाळासाहेबांची शिवसेना’ गटात प्रवेश

पिंपरी : काळेवाडीतील माजी नगरसेवक प्रकाश मलशेट्टी, उद्योजक दिलीप कुसाळकर यांच्यासह १०० हून अधिक कार्यकर्त्यांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत ‘बाळासाहेबांची शिवसेना’ गटात प्रवेश केला.

सविस्तर वाचा...

16:12 (IST) 2 Jan 2023
नागपूर : मेडिकल-मेयोतील रुग्णांचा जीव टांगणीला; निवासी डॉक्टरांच्या संपाने रुग्णसेवा विस्कळीत

उपराजधानीतील मेडिकल आणि मेयो या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांनीही मार्डच्या राज्यव्यापी संपात सोमवारी सहभाग घेतला. त्यामुळे दोन्ही रुग्णालयातील रुग्णसेवा विस्कळीत झाली. परंतु या रुग्णालयांकडून आवश्यक काळजी घेतल्याने रुग्णसेवा सुरळीत असल्याचा दावा केला जात आहे.

सविस्तर वाचा

15:36 (IST) 2 Jan 2023
धुणीभांडी करण्याचं काम संजय राऊतांसाठी शिल्लक राहणार- संजय गायकवाड

धुणीभांडी करण्याचं काम संजय राऊतांसाठी शिल्लक राहणार- संजय गायकवाड

14:40 (IST) 2 Jan 2023
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला १० वर्षे सक्तमजुरी

पुणे : मदतीच्या बहाण्याने अल्पवयीन युवतीवर अत्याचार करणाऱ्या एकास अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. के. जहागीरदार यांनी दहा वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

सविस्तर वाचा...

13:44 (IST) 2 Jan 2023
अजित पवारांच्या ‘त्या’ विधानावर उदयनराजे आणि संभाजी राजेंनी भूमिका मांडावी; हिंदू महासंघाची मागणी

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संभाजी राजे हे धर्मवीर नव्हते.अस विधान केल होत.त्या विधानानंतर राज्यातील अनेक हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज पुण्यातील डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास हिंदू महासंघाचे आनंद दवे यांनी गंगा जलने अभिषेक करून आणि पुष्पहार अर्पण करून अजित पवारांच्या विधानाचा निषेध नोंदविला. यावेळी अजित पवार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

सविस्तर बातमी

13:27 (IST) 2 Jan 2023
सावधान! समृद्धी महामार्गावरून प्रवास करताय, तर मग आधी ‘हे’ वाचाच…

समृद्धी महामार्गावरून प्रवास करीत असाल तर सावधान. तुमच्या भरधाव वेगात असलेल्या वाहनास कधीही करकचून ब्रेक लावण्याची आपत्ती तुमच्यावर ओढवू शकते. समृद्धी महामार्गावर काही ठिकाणी दुरुस्तीची कामे सुरू आहेत. मात्र, अशी कामे करताना अर्ध्या किलोमीटर आधी खबरदारीचा फलक लावणे अपरिहार्य असते.

सविस्तर वाचा

13:15 (IST) 2 Jan 2023
निवासी डॉक्टरांचा संप सुरू

वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या १४३२ जागा भरण्याचा प्रस्ताव मान्य करावा, महागाई भत्ता लागू करावा, करोना काळात मानधनातूत झालेली कपात परत द्यावी, प्राध्यापक भरती करा वसतिगृहांची डागडुजी करा अशा विविध मागण्यांसाठी राज्यातील निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या ‘मार्ड’ने सोमवारी सकाळी ८ वाजल्यापासून संप पुकारला आहे.

सविस्तर वाचा

13:03 (IST) 2 Jan 2023
सांगलीत भाजप खासदाराच्या विरोधात पक्षातच खदखद

खासदार संजयकाका पाटील यांनी जतमध्ये सुरू केलेल्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन भाजप पदाधिकार्‍यांना बाजूला ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना घेउन केल्याने जतमध्ये खासदार नेमके कोणत्या पक्षाचे असा सवाल भाजपच्या पदाधिकार्‍यांनी उपस्थित केला आहे. या निमित्ताने स्थानिक पातळीवरील भाजपअंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले असून पक्षांतर्गत असलेली खदखद उफाळून आली आहे.

सविस्तर वाचा

12:25 (IST) 2 Jan 2023
नागपूर : नववर्षदिनी ‘समृद्धी’वर वाहने सुसाट म्हणून…

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी वेगमर्यादा ओलांडून धावणाऱ्या पाच वाहनांवर कारवाई केली, तसेच अनेक वाहने थांबवून त्यांना मर्यादित वेगात वाहने चालवण्याबाबत समुपदेशन केले. या महामार्गावर दुचाकीने जाणाऱ्यांना मज्जाव करण्यात आला.

सविस्तर वाचा

12:23 (IST) 2 Jan 2023
‘हे बाळ माझे नाही, सांग कुणाचे पाप’ असे म्हणत बाळालाच बेडवरून…

प्रेमविवाह झाल्यानंतर गर्भवती पत्नीच्या चारित्र्यावर पती संशय घेत होता. मेडिकल रुग्णालयात पत्नीची प्रसूती होताच दोन दिवसांच्या बाळाला निष्ठूर पित्याने खाली आपटून ठार करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी सायंकाळी सहा वाजता घडली. याप्रकरणी अजनी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला. गिरीश महादेव गोंडाणे (३२, सावरडी, जि. अमरावती) असे आरोपीचे नाव आहे.

सविस्तर वाचा

12:18 (IST) 2 Jan 2023
परंपरेत खंड, पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय विज्ञान काँग्रेसला येणार नाही, कारण..

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यजमानपद भूषवत असलेल्या १०८ व्या भारतीय विज्ञान काँग्रेसच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्यक्ष येणार नसून दृकश्राव्य माध्यमातून उद्घाटन करणार असल्याचे आयोजन समितीकडून कळवण्यात आले आहे. यामुळे पंतप्रधान उपस्थित राहण्याच्या परंपरेला मात्र खंड पडणार आहे.

सविस्तर वाचा

12:16 (IST) 2 Jan 2023
पुणे, नवी मुंबईत दुचाकी चोरणारे गजाआड, ४ दुचाकी जप्त

पुणे : शहर परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून चार दुचाकी जप्त करण्यात आल्या असून चोरट्यांनी नवी मुंबईतील खारघर परिसरात दुचाकी चोरीचा गुन्हा केल्याचे उघडकीस आले आहे.

सविस्तर वाचा...

12:15 (IST) 2 Jan 2023
नागपूर : खळबळजनक! आमदार निवासात साफसफाई करताना आढळल्या दारूच्या बाटल्या..

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन आटोपताच दुसऱ्याच दिवशी परिसरात आणि अनेक खोल्यांमध्ये साफसफाई करताना दारूच्या बाटल्या सापडल्या. अतिसंवेदनशील ठिकाण म्हणून परिचित असलेल्या आमदार निवासात दारूच्या बाटल्या पोहोचतातच कशा, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

सविस्तर वाचा

12:15 (IST) 2 Jan 2023
बालभारती-पौड रस्ता आराखड्यात त्रुटी, ‘पादचारी प्रथम’ संस्थेचे प्रशांत इनामदार यांचे मत

पुणे : प्रस्तावित बालभारती-पौड रस्त्याच्या अडीचशे कोटींच्या आराखड्यात अनेक बाबींकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. प्रस्तावित रस्त्यामुळे वाहतूक कोंडी सुटेल का, ही शंकाच आहे, असे ‘पादचारी प्रथम’ संस्थेचे अध्यक्ष आणि रस्ता तज्ज्ञ समितीचे सदस्य प्रशांत इनामदार यांनी सांगितले.

सविस्तर वाचा...

12:11 (IST) 2 Jan 2023
कल्याण : मध्य रेल्वे मार्गावरील लोकल उशिरा धावत असल्याने प्रवासी नाराज

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी कार्यालयीन वेळ वेळेत गाठण्याच्या प्रयत्नात असलेल्या प्रवाशांना उशिरा लोकल धावण्याचा फटका बसला. सोमवारी सकाळी सात वाजल्यापासून मध्य रेल्वे मार्गावरील मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणाऱ्या हळू आणि जलद गती मार्गावरील लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहेत.

सविस्तर वाचा

12:10 (IST) 2 Jan 2023
वाकडेवाडी एसटी स्थानकात ज्येष्ठ महिलेचे दोन लाखांचे दागिने लंपास

पुणे : वाकडेवाडी एसटी स्थानकात ज्येष्ठ महिलेकडे बतावणी करुन चोरट्यांनी दोन लाखांचे दागिने असलेली पिशवी लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे.

सविस्तर वाचा...

12:06 (IST) 2 Jan 2023
'ठाकरे-आंबेडकर एकत्र आले तरी फरक पडणार नाही'; रामदास आठवलेंचा खोचक टोला

'भीमशक्ती आमच्या पाठीशी असल्याने उध्दव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले तरी काही फरक पडणार नाही. ठाकरे, आंबेडकर एकत्र आले तरी कॉंग्रेस -राष्ट्रवादी यांच्यामध्ये जागा वाटपावरुन मतभेद होतील. त्यामुळे आघाडीत बिघाडी व्हायला वेळ लागणार नाही', असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लगावला आहे. सांगलीत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांवर निशाणा साधला.

सविस्तर बातमी

11:24 (IST) 2 Jan 2023
“किरीटभाऊ बंगल्यांची चौकशी करण्याचा मूड झाला असेल, तर मुख्यमंत्र्यांकडेही…”; सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी भाजपा नेते किरीट सोमय्यांनी आक्रमक होत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. कोर्लई येथे रश्मी ठाकरे यांचे १९ बंगले होते. मात्र, आता हे बंगले गायब आहेत, याची चौकशी करावी, अशी मागणी सोमय्यांनी केली होती. तसेच याप्रकरणी सोमय्यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली. दरम्यान, या आरोपाला उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. सविस्तर वाचा

11:23 (IST) 2 Jan 2023
“दोन्ही गट एकत्र यावे असं वाटणाऱ्यांनी आधी आत्मपरिक्षण करावं”, संजय राऊतांचं केसरकरांना प्रत्युत्तर; म्हणाले, “शिंदे गटात…”

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आत्मपरिक्षण केल्यास शिवसेना एकसंध व्हायला वेळ लागणार नाही, असं विधान शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केले होते. त्यांच्या या विधानाचा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला. दोन्ही गट एकत्र यावे असं वाटणाऱ्यांनी आधी आत्मपरिक्षण करावं, असे ते म्हणाले. ते मुंबईत पत्रकारांशी बोलते होते. सविस्तर वाचा

11:22 (IST) 2 Jan 2023
नोटबंदी वैधच! सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

मोदी सरकारने २०१६ साली घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने आज मोठा निकाल दिला. केंद्र सरकारने घेतलेला नोटबंदीचा निर्णय वैधच आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. केंद्र सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या एकूण ५८ याचिकांवर सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. सविस्तर वाचा

gold-silver-price

वाकडेवाडी एसटी स्थानकात ज्येष्ठ महिलेकडे बतावणी करुन चोरट्यांनी दोन लाखांचे दागिने असलेली पिशवी लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे.