Maharashtra Breaking News Updates, 16 December 2022 : महापुरुषांवरील वादग्रस्त वक्तव्यानंतर महाविकासआघाडीने शिंदे-फडणवीस सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. १७ डिसेंबरला मविआकडून याच मुद्द्यावर महामोर्चा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरूनही राजकारणाचा पारा चढला आहे. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्र व कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेत यावर ‘जैसे थे’ स्थिती ठेवण्याचं सुतोवाच केलं. यावरही अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. याशिवाय राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचंही वारं सुरू आहे. एकूणच राज्यातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा एकाच क्लिकवर…

Live Updates

Latest Marathi Batmya Today, 16 December 2022 : राज्यातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा एका क्लिकवर...

16:19 (IST) 16 Dec 2022
कनिष्ठ महाविद्यालय तुकडीवाढीचे अधिकार राज्य शासनाकडे; शालेय शिक्षण विभागाचा निर्णय

राज्यातील शिक्षण उपसंचालकांना असलेले बारावीच्या नैसर्गिक वाढीने वर्ग मंजुरीचे अधिकार शालेय शिक्षण विभागाने रद्द केले आहेत. महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम २०१२ अन्वये मान्यता देण्यात आलेली कनिष्ठ महाविद्यालये वगळून इतर कनिष्ठ महाविद्यालयांना तुकडीवाढ मंजुरीचे अधिकार केवळ राज्य शासनाकडे असतील.

सविस्तर बातमी

16:18 (IST) 16 Dec 2022
पुणे : रात्रगस्तीवरील पोलीस अधिकाऱ्यावर गुंडांकडून दगडफेक

पुण्याच्या वारजे भागातील गणपती माथा रात्री उशीरापर्यंत सुरु असणाऱ्या पानपट्टीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह पोलीस कर्मचाऱ्यावर दगडफेक करण्यात आली. या प्रकरणी सराईत गुन्हेगारासह तिघांना अटक करण्यात आली असून दहा जणांच्या विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर बातमी

16:17 (IST) 16 Dec 2022
पुण्यात प्रेमप्रकरणातून विवाहित तरुणाची नदीपात्रात उडी मारुन आत्महत्या

प्रेमप्रकरणातून विवाहित तरुणाने आत्महत्या केल्याची घटना येरवडा भागात घडली. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन एका तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हरिश प्रेमकिशन पवार (वय २४, रा. लष्कर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी एका तरुणीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर बातमी

15:59 (IST) 16 Dec 2022
मुंबई: समुद्री किनाऱ्यावर उभी राहणार 'कृत्रिम समुद्री भिंत'

जपान, ऑस्ट्रेलियासह जगातील बहुतांश देशात सागरी जीवांची उत्पत्ती वाढवण्यासाठी, जैवविविधतेचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी कृत्रिम समुद्री भिंत (आर्टिफिशियल रिफ) तयार करण्यात आली आहे. तशीच कृत्रिम भिंत आता सागरी किनारी मार्ग (कोस्टल रोड) प्रकल्पातील निवडक सहा ठिकाणी उभी करण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा

15:13 (IST) 16 Dec 2022
हा महाराष्ट्रद्रोह नाही का? आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंना विचारणा; म्हणाले “कसले डोंबलाचे मोर्चे…”

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि उपनेत्या सुषमा अंधारे यांना केलेल्या वक्तव्यांमुळे सध्या वाद निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपा मुंबईत ‘माफी मांगो’ आंदोलन करणार आहे. भाजपा नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत यासंबंधी माहिती देताना संजय राऊत, सुषमा अंधारे यांच्यासह उद्धव ठाकरेंनाही लक्ष्य केलं. उद्धव ठाकरेंनी मौन का बाळगलं आहे अशी विचारणाही यावेळी त्यांनी केली.

सविस्तर बातमी

14:37 (IST) 16 Dec 2022
मुंबई: खादी आणि ग्रामोद्योग आयोगाला उच्च न्यायालयाचा दिलासा; प्रतिवादी संघटनेला ‘खादी’ आणि ‘चरखा’ वापरण्यास मनाई

मुंबईस्थित ग्रामोद्योग संघटनेला खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या ‘खादी’ आणि ‘चरखा’ या नोंदणीकृत व्यापारचिन्हाच्या (ट्रेडमार्क) वापरास उच्च न्यायालयाने तूर्त मज्जाव केला आहे. नोंदणीकृत ‘खादी’ शब्द आणि ‘चरखा’ या चिन्हाचा मुंबईतील खादी आणि ग्रामोद्योग संघटना व्यापारासाठी वापर करत असल्याचा दावा खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने केला असून त्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

सविस्तर वाचा

13:37 (IST) 16 Dec 2022
महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आज सोलापूर बंदची हाक; व्यापाऱ्यांचा बंदला उत्तम प्रतिसाद

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपा नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राज्यातील वातावरण तापले आहे. या विधानाचा निषेध नोंदवण्यासाठी आज सोलापूरात शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाने शहर बंदचे आव्हान केले आहे. या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला असून, बहुतेक व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली आहे.

सविस्तर बातमी

12:52 (IST) 16 Dec 2022
"राज ठाकरे आमच्याबरोबर आले तर स्वागतच, परंतु...", शिंदे गटाच्या मंत्र्याचं मोठं वक्तव्य

मनसे प्रमुख राज ठाकरे आणि भाजपा-शिंदे गटाची राजकीय जवळीक वाढली आहे. त्यामुळे मनसे महायुतीत येण्याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र,अद्याप अधिकृत कोणतीही घोषणा झालेली नाही. दुसरीकडे राज ठाकरेंनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दारुगोळा साठवून ठेवलेला बरा, ज्यावेळी गरज लागेल तेव्हा हा दारुगोळा बाहेर काढेल, असं वक्तव्य केलं. यावर शिंदे गटातील नेते आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना मनसेही महायुतीत सहभागी होणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सत्तारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते शुक्रवारी (१६ डिसेंबर) टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.

सविस्तर बातमी...

12:46 (IST) 16 Dec 2022
"महावितरण अदानी कंपनीस चालवण्यास देऊ नका", नाशिकमध्ये वीज कर्मचाऱ्यांची मागणी

महाराष्ट्र राज्यातील ठाणे व नवी मुंबई परिसरातील महावितरण कंपनीच्या अधिपत्याखालील क्षेत्रात अदानी इलेक्ट्रिकल कंपनीस चालवायला देण्यासाठी समांतर परवाना राज्य सरकारने देऊ नये, अशी मागणी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कर्मचारी, अभियंता संघर्ष कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी वीज कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचाही इशारा दिला. या मागणीचे निवेदन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना येवला येथे देण्यात आले.

12:45 (IST) 16 Dec 2022
मुंबई: समृद्धीवर फूड प्लाझा आणि इतर सुविधांसाठी किमान वर्षभराची प्रतीक्षा?

नागपूर ते शिर्डी असा ५२० किमीचा समृद्धी महामार्ग रविवारपासून वाहतूक सेवेत दाखल झाला आहे. मात्र या मार्गादरम्यान खानपान, शौचालय, गॅरेज अशा सुविधा नसल्याने वाहनचालक-प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

सविस्तर वाचा

12:44 (IST) 16 Dec 2022
मुंबई: समृद्धीवर फूड प्लाझा आणि इतर सुविधांसाठी किमान वर्षभराची प्रतीक्षा?

नागपूर ते शिर्डी असा ५२० किमीचा समृद्धी महामार्ग रविवारपासून वाहतूक सेवेत दाखल झाला आहे. मात्र या मार्गादरम्यान खानपान, शौचालय, गॅरेज अशा सुविधा नसल्याने वाहनचालक-प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

सविस्तर वाचा

12:33 (IST) 16 Dec 2022
नागपूर: हिवाळी अधिवेशनात वि.प. सभापतीपदाची निवडणूक होणार की टळणार?

विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात ( विधान परिषद) विरोधी पक्ष बहुमतात असल्याने नागपूर हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी शिंदे- भाजप सरकार सभापतीपदाची निवडणूक घेणे टाळणार की, विरोधी पक्षात फूट पाडून फडणवीस पुन्हा एकदा राजकीय धमाका करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सविस्तर वाचा

12:16 (IST) 16 Dec 2022
'लव्ह जिहादसाठी कायदा करण्याची गरज नाही'; दिलीप वळसे पाटील यांचे मत

शक्ती कायदा राज्यातून राष्ट्रपतीकडे मान्यतेसाठी गेला आहे. ज्यावेळेस मान्यता मिळेल तेव्हा तो अंमलात येईल. त्यात काही त्रुटी आहेत. त्यातूनही मार्ग निघेल. मात्र. लव जिहाद हा विषय राजकीय असल्याने त्यासाठी कायदा करण्याची गरज नसल्याचे वक्तव्य माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे.

सविस्तर बातमी

12:04 (IST) 16 Dec 2022
ठाणे: कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अस्वच्छता

ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गुरुवारी केलेल्या दौऱ्यामध्ये आयुक्त अभिजीत बांगर यांना सर्वत्र अस्वच्छता दिसून येण्याबरोबरच ७० हुन अधिक सफाई कामगार गैरहजर असल्याचे दिसून आले.

सविस्तर वाचा

11:33 (IST) 16 Dec 2022
ठाण्यात पुन्हा काही काळ वाहतूक कोंडी, यावेळी मुंबई पालिकेच्या वाहनाला अपघात झाल्याचे निमित्त…

मागील काही दिवसांपासून विविध कारणांमुळे ठाण्यात वाहतूक कोंडीचा जाच वाहन चालकांना सहन करावा लागत आहे. शुक्रवारी सकाळीही ठाण्यातील पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. मुंबई महापालिकेच्या वाहनाची डिझेलची टाकी फुटल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात डिझेल सांडले होते. परिणामी कॅडबरी जंक्शन ते माजीवडापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, आता कोंडी सुटली असून वाहतूक पूर्ववत झाली आहे.

सविस्तर बातमी

11:08 (IST) 16 Dec 2022
हिमाचलमध्ये सरकार येताच काँग्रेस सरकार अटल बोगद्याचं नाव बदलणार? मुख्यमंत्री म्हणाले “ज्यांनी पायाभरणी केली…”

हिमाचल प्रदेशात सत्तांतर झाली असून काँग्रेसचं सरकार स्थापन झालं आहे. दरम्यान, काँग्रेसची सत्ता येताच अटल बोगद्याचं नामकरण होणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र हिमालच प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. आमचं सरकार रोहतांग खिंडीतून बांधण्यात आलेल्या अटल बोगद्याचं नामकरण करणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र यावेळी त्यांनी फलकावरील नावांमध्ये बदल होणार असल्याचं स्पष्ट केलं.

सविस्तर बातमी

11:06 (IST) 16 Dec 2022
पुण्यात गोवरचा शिरकाव; ११ बालकांना संसर्ग

गेल्या सुमारे महिनाभरापासून राज्याच्या विविध भागांत गोवरचे रुग्ण आढळून येत आहेत. प्रामुख्याने मुंबई आणि परिसरात असलेले रुग्ण पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये आढळून आले होते. मात्र, आता पुणे महापालिका क्षेत्रातील दाट लोकवस्तीच्या काही भागांमध्ये सुमारे ११ बालकांना गोवरचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे.

सविस्तर बातमी...

11:05 (IST) 16 Dec 2022
पुण्यात पथदिव्यांच्या खांबांना दोन कोटींची ‘झळाळी’; जी-२० परिषदेच्या निमित्ताने पथदिव्यांची रंगरंगोटी

जी-२० परिषदेच्या निमित्ताने महापालिकेने सुशोभीकरणाला प्राधान्य दिले असून शहरातील सहा हजार पथदिव्यांच्या खांबांची एकसमान रंगरंगोटी करण्यात येणार आहे. त्यासाठी दोन कोटी १३ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून एका खांबासाठी दोन हजार रुपयांचा खर्च महापालिका करणार आहे. दरम्यान, एक हजार नवीन फायबरचे पथदिवे बसविण्याचे प्रस्तावित असून एका खांबासाठी २३ हजार रुपये खर्च केला जाणार आहे.

सविस्तर बातमी...

11:04 (IST) 16 Dec 2022
“छत्रपती संभाजी महाराजप्रेमींच्या भावना…”; ‘कालनिर्णय’ने २०२३ च्या अवृत्तीमधील ‘त्या’ चुकीसाठी व्यक्त केली दिलगीरी

दरवर्षी दिवाळी संपल्यानंतर चर्चा सुरु होती ती पुढील वर्षाच्या कॅलेंडरची. मराठी जनांसाठी तर कॅलेंडर म्हणजे कालनिर्णय हे जणू काही समिकरणच झालं आहे. त्यामुळेच दरवर्षी इयरएण्डला ‘भितींवरी कालनिर्णय असावे’ असं सांगणारी जाहिरात आवर्जून ऐकायला, पहायला मिळते. आता तर कालनिर्णय डिजीटल स्वरुपामध्येही उपलब्ध आहे. मात्र पुढील वर्षीच्या म्हणजेच २०२३ च्या कालनिर्णयमध्ये एक मोठी चूक झाल्याची माहिती समोर आली आहे. ‘कालनिर्णय’नेच ही चूक मान्य केली असून ट्वीटरवरुन यासंदर्भातील माफी मागितली आहे.

सविस्तर बातमी...

Maharashtra News Live Updates Today

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह अपडेट्स, महाराष्ट्र पॉलिटिकल अपडेट्स

Story img Loader