महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत लातूर व गोंदिया या दोन जिल्ह्यांनी राज्यात सर्वप्रथम १०० टक्के तंटामुक्त होण्याचा बहुमान पटकाविला आहे. या दोन्ही जिल्ह्यांतील सर्वच्या सर्व गावांनी पाच वर्षांंच्या कालावधीत तंटामुक्तीसाठी पात्र ठरण्याचा निकष पूर्ण केला, हे विशेष. त्यात लातूरमधील ७८६, तर गोंदियातील ५५६ गावांचा समावेश आहे.
महात्मा गांधी तंटामुक्त मोहिमेचे सध्या सहावे वर्ष सुरू आहे. २०११-१२ या पाचव्या वर्षांतील तंटामुक्त गावांची यादी शासनाने काही दिवसांपूर्वी जाहीर केली. त्यात या दोन्ही जिल्ह्यातील १०० टक्के तंटामुक्त गाव ठरल्याचे शासनाने म्हटले आहे. गावपातळीवर सलोख्याचे वातावरण निर्माण करून आपआपसातील तंटे सामोपचाराने सोडविण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यात दहा लाखहून अधिक वेगवेगळ्या स्वरूपाचे तंटे सामोपचाराने मिटविण्यात आले. गावपातळीवर छोटय़ा छोटय़ा कारणावरून निर्माण होणाऱ्या तंटय़ांचे पर्यवसान मोठय़ा स्वरूपाच्या तंटय़ात होते. यामुळे गावात कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होतो. स्थानिक पातळीवरील मतभेद वा असे वाद मिटवून विकासाला चालना देण्याकरिता शासनाने २००७-०८ मध्ये या मोहिमेची मुहूर्तमेढ रोवली. गावपातळीवर तंटे निर्माण होऊ नये म्हणून उपक्रम राबविणे, दाखल असणारे व नव्याने निर्माण होणाऱ्या तंटय़ांचे निराकरण करून ते कमी करणे ही या मोहिमेची प्रमुख वैशिष्टय़े. त्यांची पूर्तता करण्यासाठी मोहिमेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक गावास तंटामुक्त गाव समितीची स्थापना करावी लागते. ही समिती स्थानिक पोलीस ठाणे, महसूल व इतर शासकीय विभागांचे अधिकारी यांच्या मदतीने मोहिमेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करते.
मोहिमेच्या प्रारंभापासून लातूर व गोंदिया हे दोन जिल्हे अंमलबजावणीत अग्रेसर होते. त्याचे फलित पाचव्या वर्षांत दोन्ही जिल्ह्यांतील सर्व म्हणजे १०० टक्के गावे तंटामुक्तीसाठी पात्र ठरण्यात झाले. पहिल्या वर्षांत म्हणजे २००७-०८ मध्ये लातूर जिल्ह्यातील ७८६ गावांनी मोहिमेत सहभाग नोंदविला होता. त्यातील ३०० गावे तंटामुक्त म्हणून जाहीर झाली. त्या पुढील वर्षांत लातूरमधील ३७१ गावे तंटामुक्तीसाठी पात्र ठरली. उर्वरित गावांनी त्यानंतरच्या वर्षांत हा निकष पूर्ण केला. गोंदिया जिल्ह्यातील ५५६ पैकी २६२ गावे २००८-०९ मध्ये, तर २०५ गावे २००९-१० या तिसऱ्या वर्षांत तंटामुक्त गाव म्हणून जाहीर झाली होती. या जिल्ह्यातील उर्वरित गावे पुढील वर्षांत तंटामुक्तीचा निकष पूर्ण करण्यात यशस्वी झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा