लातूर : लातूर तालुक्यातील मुरुड शेजारील करकट्टा या गावी एका ४० वर्षीय तरुणाचा भर दिवसा गळा चिरून खून करण्यात आला आहे. रविवारी दुपारी ही घटना घडली असून याप्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात पाच जणाविरुद्ध आरोपीच्या पत्नीने तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वैशाली शरद इंगळे वय ३९ यांनी मुरुड पोलिसात दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की अनैतिक संबंधाच्या संशयावरून पाच आरोपीने आपले पती शरद प्रल्हाद इंगळे यांचा रविवारी करकट्टा येथील खडी केंद्रावर ऊस तोडण्याच्या कोयत्याने हल्ला करून खून करण्यात आला आहे, या आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी केली आहे.

करकट्टा येथील मुकादम म्हणून काम करणारे शरद प्रल्हाद इंगळे हे गावालगत असलेल्या खडी केंद्रावर गुढीपाडव्याचा दिवस असला तरी रविवारी कामाला गेले होते .या ठिकाणी जाऊन शरद इंगळे यांच्यावर कोयत्याने आरोपीने हल्ला केला व त्याचा गळा चिरून आरोपी पसार झाले आहेत. ही घटना घडल्यानंतर एकाने ही पाहिली असल्याचेही समोर आले आहे. ही घटना इतकी भयंकर होती की जागीच शरद इंगळे चा मृत्यू झाला. नातेवाईक संतप्त झाले होते तीन तास घटनास्थळीच प्रेत पडलेले होते .त्यानंतर ते शवविच्छेदनासाठी नेण्यात आले .पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा मयताची पत्नी वैशाली इंगळे यांच्या फिर्यादीवरून या प्रकरणातील संशयित आरोपी रोहन बाळासाहेब शिंदे, रोहित बाळासाहेब शिंदे ,बाळासाहेब भारत शिंदे ,गणेश भारत शिंदे व एक महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .खुनातील मारेकऱ्यांना तातडीने अटक करावी अशी मागणी ही फिर्यादीच्या नातेवाईकाने केली आहे.