लातूर : लातूरमधील पाणीटंचाईची परिस्थिती भीषण रूप धारण करत आहे. जानेवारीतच लातूर शहराला आठवडय़ातून एकदा पाणीपुरवठा केला जात असून, जिल्ह्यातील १०९७ गावे आणि २५२ वाडयावस्त्याही टंचाईच्या सावटाखाली आहेत. मांजरा धरणामध्ये केवळ २० टक्के जिवंत पाणीसाठा आहे. दहा वर्षांपूर्वी लातूरला रेल्वेने पाणी आणावे लागले होते. त्याची चर्चा देशभर झाली होती. आता पुन्हा आलेला टंचाईचा फेरा ‘रुळांवरच्या’ मार्गाने नेतो की काय, अशी चिंता भेडसावत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लातूर शहरवासीयांना गतवर्षीच्या मार्च ते ऑक्टोबर २०२३ पर्यंत आठवडयातून दोनदा पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे व लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात जलसाठा कमी असल्याने पाणी कपात करण्यात आली आहे. शहरवासीयांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विजयकुमार चव्हाण यांनी केले आहे.

हेही वाचा >>> फॅसिझमसाठी सरकारचा पाच कलमी कार्यक्रम; पवार यांचा केंद्रावर हल्लाबोल, मराठा आरक्षणातही फसवणूक झाल्याची भावना 

लातूर शहरवासीयांना आठवडय़ातून चार दिवस पाणी वितरण केले जाते व दोन दिवस टाक्यांमध्ये पाणी भरून घेण्यासाठीचा वेळ दिला जातो. आठवडय़ातून एक वेळ पाणी नळावाटे दिले जाते. लातूर शहरात मनपाच्या १०६० विंधन विहिरी असून, त्यातील ९५० विंधन विहिरी सुरू आहेत. काही भागात या विंधन विहिरी मार्फतही पाणी वितरण केले जाते. शहरवासीयांकडे खासगी विंधन विहिरीचे प्रमाण अतिशय मोठे आहे. किमान ५० हजार पेक्षा जास्त खासगी विंधन विहिरी असण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नळाच्या पाण्यावर फारसे विसंबून कोणी राहत नाही. पिण्याच्या पाण्यासाठी नळाच्या पाण्याचा वापर केला जातो. पाण्याचे जार विकत घेण्याचे प्रमाणही वाढले आहे. यावर्षी पाऊस सरासरीपेक्षा कमी झाल्यामुळे जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या काळात जिल्ह्यात पाणीटंचाईची भीती असून, जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारणासाठी ३९ कोटी ४८ लाख ६३ हजार रुपयांचा आराखडा तयार केला आहे. डिसेंबरपासून जिल्ह्यातील बारा गावे आणि तीन वाडय़ाला पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या  लागणार आहेत. लातूर तालुक्यातील चार, औसा दोन, अहमदपूर तीन गावे आणि तीन वाडय़ा, शिरूर, अनंतपाळ व जळकोट तालुक्यातील प्रत्येक एका गावात पाणीटंचाई जाणवत आहे. या गावाने अधिग्रहणासाठी पंचायत समितीकडे प्रस्ताव पाठवलेले आहेत.

हेही वाचा >>> “दादा मला वाचवा”, सुरेश वाडकरांची भर सभेत अजित पवारांना विनंती; म्हणाले, “काका मला…”

’ यावर्षी जानेवारी ते मार्च या कालावधीत जिल्ह्यातील १०९७ गावे आणि २५२ वाडय़ांना पाणीटंचाईची धास्ती आहे.

’ टंचाई निवारण्यासाठी १९ कोटी ६३ लाख २० हजार रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून, एक एप्रिल ते ३० जून या कालावधीसाठी १९ कोटी ८५ लाख ४३ हजारांचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

’ यावर्षीच्या उपाययोजनांमध्ये १४६ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाईल. ५५८ विहीर व विंधन विहिरींचे  अधिग्रहण केले जाईल. २८१ विंधन विहीर नव्याने घेतल्या जातील. ’ ४७ नळ योजनांची दुरुस्ती हाती घेतली जाणार असून, ३६ विहिरींचा गाळ काढण्याची योजना आहे. १०९७ गावांना संभाव्य टंचाईची भीती व्यक्त केली जात आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Latur district faces severe water scarcity once in a week water supply zws