लातूर – उदगीर तालुक्यातील गुरदळ येथील एका खून प्रकरणात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती आर. एन. कदम यांनी शुक्रवारी बारा आरोपींना जन्मठेप व प्रत्येकी दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. राजकीय शत्रुत्व, वैयक्तिक द्वेषातून २३ मे २००३ रोजी आपले वडील दिगंबर यशवंतराव पाटील यांचा मारहाण करून खून करण्यात आल्याची तक्रार मृताचा मुलगा बसवराज पाटील यांनी उदगीर पोलीस ठाण्यात दिली होती. त्यावरून एकूण १३ जणांविरुद्ध खुनासह इतर कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते.

शिवराज हनुमंतराव पाटील, दिलीप शिवराज पाटील, रामराव भगंवतराव उजळंबे, शंकर विठ्ठलराव पाटील, माधव राजेंद्र शिंदे, संजय शिवराज पाटील, राजकुमार शिवराज पाटील, राजेंद्र बाजीराव शिंदे, विनायक हनुमंतराव पाटील, रतिकांत विनायकराव पाटील, मारुती दौलतराव बिरादार, विजयकुमार शिवराज पाटील व विठ्ठल माधवराव पाटील (सर्व रा. गुरदळ), अशी जन्मठेप झालेल्या बारा आरोपींची नावे आहेत. एकूण १३ पैकी एक आरोपीचा सुनावणीदरम्यान मृत्यू झालेला आहे.

घटनेच्या दिवशी सकाळी साडेदहाच्या सुमारास दिगंबर यशवंतराव पाटील (वय ५८) हे घरी जेवण करत असताना या गुन्हातील आरोपींनी संघटितपणे घरात घुसून राजकीय शत्रुत्व, वैयक्तिक द्वेषातून डोक्यात काठीने हल्ला केला. यात दिगंबर पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. मारहाणीत अन्य व्यक्तींना जखमी केले.

खटल्याची सुनावणी झाली तेव्हा १३ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. या प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील गौस पाशा, शिवकुमार गिरवलकर आदींनी काम पाहिले आहे.

Story img Loader