महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात लगीनसराईचा काळ आहे. लग्नाची घाईगडबड सगळीकडे दिसून येत आहे. लातूर जिल्ह्यात उदगीर तालुक्यातील एका नवरदेवाचा लग्नपत्रिका वाटताना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बुधवारी (दि. १० एप्रिल) रोजी २२ वर्षीय विशाल भिवा निलेवाड आणि त्याचा चुलत भाऊ आकाश धोंडिबा निलेवाड (वय २५) हे दोघे लग्नपत्रिका वाटायाल नातेवाईकांकडे जात होते. मात्र त्यांच्या दुचाकीला एका चारचाकी वाहनाची धडक बसल्यामुळे जबर अपघात होऊन दोघांचाही मृत्यू झाला.
या अपघातामुळे उदगीर तालुक्याच्या अनुपवाडी गावावर शोककळा पसरली. विशाल निलेवाडचे १८ एप्रिल रोजी लग्न होते. लग्नाच्या पत्रिका वाटण्यासाठी तो करडखेल या गावी मोटारसायकलने जात होता. दरम्यान करडखेल गावी जात असताना लोहारा गावाजवळ एका चारचाकी वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दली. या धडकेत मोटारसायकल रस्त्यावरून बाजूला फेकली गेली. ज्यामध्ये दोन्ही भावांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
सदर अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही भावांचे मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी उदगीरच्या शासकीय रुग्णालयात पाठविले. या प्रकरणी आता पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
उदगीर-निलंगा मार्गावरही अपघात
दरम्यान आज लातूरमध्येच आणखी एक भीषण अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे. उदगीर निलंगा राज्य मार्गावर चारचाकी आणि ट्रकची धडक झाली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. मध्य प्रदेशमधील कापड व्यापारी आणि त्यांचे सहकारी चारचाकी वाहनाने प्रवास करत असताना त्यांच्या वाहनाला ट्रकने धडक दिली. या अपघातात चारचाकी कारचा चेंदामेंदा झाला. अपघात इतका भीषण होता की, कारमधील चार जण जागीच ठार झाले.