लातूर पोलिसांनी महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेल्या सुगंधी पान मसाला गुटख्यावर कारवाई केली. वाहन क्रमांक एम.एच. ४३ ए ०१५० या इंडिगो कारमधून गुटखा तस्करी होत असताना पोलिसांनी कारवाई केली. उदगीर शहर पोलिसांना गुटख्याची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली.
उदगीरमधील शाहू चौक येथे पोलिसांनी सापळा रचला आणि गुटखा घेऊन जाणार्या इंडीगो कारला पकडले. या कारमध्ये गुटखा आढळून आल्याने हा गुटखा जप्त करण्यात आला. तसेच कारचालकाला उदगीर शहर पोलीस स्टेशन येथे आणून कारवाई कण्यात आली. त्यात एक लाख ३५ हजार रुपयाच्या गुटख्यासह ६० हजार रुपये किमतीची इंडीगो कार असा एकूण १ लाख ९५ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी आरोपिकडून जप्त केला आहे.
हेही वाचा : लातूरमध्ये लग्नाला आलेल्या वऱ्हाडावर कोसळला दुःखाचा डोंगर, सख्ख्या भावांसह तिघांचा बुडून मृत्यू
अन्न सुरक्षा अधिकारी विठ्ठल सटवाजी लोंढे यांच्या फिर्यादीवरुन गुटखा विकणार्या आरोपी विरुद्ध अन्न व औषध प्रशासनाने काढलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांनी दिली.