प्रदीप नणंदकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लातूर : वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची हमी देणारे शहर म्हणून लातूरची ओळख होत आहे. राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी ३० टक्के विद्यार्थी लातूर शहरातून ‘नीट’ परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. पहिल्या प्रवेश फेरीअखेर ६,८४५ विद्यार्थ्यांमध्ये एकटय़ा लातूरचा वाटा १६०० हून अधिक आहे. त्यात दुसऱ्या फेरीत आणि केंद्रीय कोटय़ातील विद्यार्थ्यांची भर पडणार असल्याने ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

राज्यात ३१ शासकीय, तर २२ खासगी वैद्यकीय महाविद्यालये आहेत. शासकीय महाविद्यालयांतील १५ टक्के जागा या केंद्रीय प्रवेशासाठी राखीव असतात, तर खासगी महाविद्यालयांतील १५ टक्के जागा व्यवस्थापन मंडळासाठी राखीव असतात. शासकीय महाविद्यालयांत ४,९५० विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात, तर खासगी महाविद्यालयांत ही संख्या ३,१७० आहे. शासकीय महाविद्यालयांतील राज्याचा कोटा ४,१५४ तर खासगी महाविद्यालयाचा कोटा २,६९१ आहे. शासकीय आणि खासगी महाविद्यालयांत राज्याचा कोटा हा ६,८४५ विद्यार्थ्यांचा आहे.

नवे प्रारुप नवी झळाळी

यंदा वैद्यकीय महाविद्यालयांतील प्रवेशाच्या पहिल्या फेरीत लातूरच्या १६००हून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. ही संख्या एकूण प्रवेश मर्यादेच्या विद्यार्थ्यांच्या २३.३७ टक्के एवढी होते. आणखीन दोन फेऱ्या बाकी आहेत. शेवटच्या फेरीपर्यंत त्यांत किमान ५०० विद्यार्थ्यांची भर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे वैद्यकीय शिक्षणाच्या लातूर प्रारुपास नवी झळाळी आली आहे. शासकीय महाविद्यालयातील पहिल्या प्रवेश फेरीसाठी ५८७ गुण, तर खासगीसाठी ५३४ गुण असल्याचे स्पष्ट झाले आहे. लातूर शहरात ‘नीट’ परीक्षा दिल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेशासाठी अर्ज करण्याचा सल्ला देणारी २० केंद्र आहेत. ‘व्हिजन करिअर कौन्सिलिंग सेंटर’चे योगेश्वर गुट्टे यांनी शहरातील सर्व कौन्सिलिंग केंद्रांशी संपर्क करून ही आकडेवारी मिळवली.

दबदबा असा..

  • केवळ शासकीय आणि खासगीच नाही तर केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतही लातूरचे विद्यार्थी किमान १०० जागांवर प्रवेश घेतील.
  • एम्स महाविद्यालयात प्रवेश घेणारे किमान ५० विद्यार्थी लातूरचे असतील. हा आकडा २,२५० वर जाईल.
  • या व्यतिरिक्त लातूर जिल्ह्यातील उदगीर, अहमदपूर, औसा, निलंगा या ठिकाणचे किमान १५० विद्यार्थी वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेश घेतील.
  • यंदा वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रथम वर्षांत प्रवेश घेणारे सुमारे २४०० विद्यार्थी लातूरमधून शिक्षण घेतलेले असतील.

गुणवंतांची नगरी

यावर्षी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. ज्यांना प्रवेशाची हमी वाटते असे बहुतांश विद्यार्थी लातूरमध्ये शिकायला येतात. त्यामुळेच लातूरची ही आकडेवारी वाढली आहे. संपूर्ण देशभरात नीट परीक्षेत लातूरने आपला दबदबा कायम ठेवला आहे. लातूरला म्हणूनच गुणवंतांची नगरी असे म्हटले जाते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Latur quality effect on medical access 1600 students in first round ysh
Show comments