धाराशिव : लातूर ते टेंभुर्णी या महामार्गाची दुरावस्था पाहून आपल्यालाही शरम वाटते. यापूर्वीच या रस्त्याचे काम पूर्ण होणे गरजेचे होते. मात्र आता लवकरच हा रस्ता चारपदरी महामार्गात रूपांतरित केला जाणार असल्याची घोषणा केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी केली. धाराशिव जिल्ह्यातील महामार्गाच्या प्रलंबित कामांसाठी २२० कोटी रूपये अधिकचा निधी मंजूर केला आहे. त्यापैकी १७४ कोटी रूपयांच्या विकासकामांचे आज भूमिपूजन होत असल्याची माहिती केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
धाराशिव शहरातील सिध्दाई मंगल कार्यालय येथे केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने १७४ कोटी रूपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील, सेवानिवृत्त सनदी अधिकारी तथा मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविणसिंह परदेशी, जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
आणखी वाचा-महाविकास आघाडीत काय सुरू आहे माहिती नाही…. प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले !
पुढे बोलताना गडकरी म्हणाले की, लातूर-टेंभुर्णी हा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्वाचा मार्ग आहे. मराठवाड्याच्या विकासासाठी तो अत्यंत महत्वपूर्ण आहे. आजच्या घडीला या महामार्गाची प्रचंड दुरावस्था झाली आहे. लवकरच हा महामार्ग चारपदरी केला जाणार आहे. त्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. मराठवाड्यात चांगले रस्ते झाले, तरच मराठवाड्याचा विकास होईल आणि शेतकर्यांना आपल्या शेतातील उत्पादने कमी वेळात मोठ्या बाजारपेठेत पोहोचवता येतील. त्यातून मराठवाड्याचा सर्वांगीण विकास होईल. त्यामुळेच आपण लवकरात लवकर लातूर ते टेंभुर्णी हा चारपदरी महामार्गही पूर्ण करणार असल्याची घोषणा गडकरी यांनी यावेळी केली.
आणखी वाचा-महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील गस्त अधिक कठोर करणार
पन्नास हजार कोटी रूपयांचा काश्चिर ते कन्याकुमारी हा उत्तरेकडून दक्षिणेला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. हा महामार्ग धाराशिव जिल्ह्यालाही जोडला जाणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले. भारत देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. विदर्भापेक्षाही मराठवाडा आणि परिसरात ऊसाचे उत्पन्न जास्त आहे. बागायती जमिनी सुध्दा अधिक आहेत. त्यामुळे साहजिकच साखर कारखान्यांची संख्या देखील मराठवाड्यात सर्वाधिक आहे. सगळे कारखाने इथेनॉल निर्मिती करू शकतात. मोठ्या प्रमाणात इथेनॉलची निर्मिती झाल्यास अगदी शेतकरी सुध्दा आपली स्कूटर इथेनॉलवरती चालवेल. परिणामी पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या किंमती आपोआप कमी होतील आणि शेतकर्यांची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही, असे मतही मंत्री गडकरी यांनी व्यक्त केले. देशात शहरांची प्रगती होत आहे, तशीच ती ग्रामीण भागाचीही अपेक्षित आहे. केवळ सिटी स्मार्ट होवून चालणार नाही. तर खेडी सुध्दा स्मार्ट आणि प्रगत झाली पाहिजेत. दुर्गम भागात रस्ते, वीज पुरवठा करून या भागांना शहराशी जोडायला हवे. त्यासोबत मोठे व्यवसाय उभे करून तरूणांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देण्याची भावनाही यावेळी बोलून दाखवली.