पतंजली योगपीठाचे गुरू रामदेव बाबांचे पट्टशिष्य-पट्टशिष्या अनंत झांबरे व सुनीता झांबरे यांनी पुणे जिल्ह्य़ात कात्रज-सासवड बायपास, होळकरवाडीनजीक झांबरे-पाटीलनगरांमध्ये निसर्गाच्या सान्निध्यात व प्रदूषणरहित वातावरणात, उभारलेल्या ‘आरोग्यम् योग आश्रमास’ हास्य क्लब खोपोलीच्या महिला व पुरुष अशा एकत्रित १५० सदस्यांनी १४ ऑक्टोबरला भेट दिली. पतंजली योग समिती रायगडचे माजी अध्यक्ष तथा भारत स्वाभिमान ट्रस्टचे विद्यमान रायगड जिल्हा संरक्षक गौतमभाई लेवूवा, हास्य क्लब खोपोलीचे अध्यक्ष बाबुभाई ओसवाल, योगशिक्षिका जयमाला पाटील, संध्या पाटील, साहित्यिक-कवयित्री उज्ज्वला दिघे, गुरुअंगद दरबारचे सचिव कुलवंतसिंग व त्यांच्या सुविद्य पत्नी, सा. जिद्दचे व्यवस्थापक बोंडे, आयुर्वेदाचार्य डॉ. सुप्रिया टिळक व अन्य मान्यवर या भेटीत सहभागी होते. आरोग्य सहल स्वरूपातील ही भेट उद्दिष्टपूर्तीची ठरली.
व्यवसाय करीत असताना, योगाभ्यास व आयुर्वेदशास्त्राकडे आपण व आपली पत्नी ओढले गेलो. या क्षेत्रांतील अनेक तज्ज्ञांकडून मार्गदर्शन प्राप्त केले. रोगनिवारण योग या संकल्पनेंतर्गत अनेक जुनाट रोगांवर योग, प्राणायाम व आयुर्वेद उपचारपद्धतीने अतिशय परिणामकारक इलाज होतात यांचे प्रत्यक्षदर्शी अनुभव मिळाले. या योगोपचारपद्धतीचा लाभ सर्व स्तरांतील रुग्णांना ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला व त्यातूनच तज्ज्ञ व अनुभवी योगशिक्षक व आयुर्वेदाचार्याच्या साथीने सुमारे ५ एकर जागेत ‘आरोग्यम् योग आश्रमा’ची आपण दोन वर्षांपूर्वी उभारणी केली. तत्पूर्वी महाराष्ट्रभर आम्हा उभयतांनी सुमारे ‘५५० योग प्राणायामची शिबिरे आयोजित केली. सुमारे ७ लाख लोकांना प्रशिक्षित केले. सुमारे ४५ हजार रुग्णांना या माध्यमातून रोगमुक्त केले, अशी माहिती ‘आरोग्यम् योग आश्रमां’चे संचालक योगतज्ज्ञ अनंत झांबरे यांनी या भेटीप्रसंगी बोलताना दिली.
या आश्रम परिसरात तेलकंद काळी हळद, काळी निरगुडी, पांढरा पळस पुनर्नवा, तीनधारी कांडवेल यांसारख्या दुर्मिळ औषधी वनस्पतीसह अश्वगंधा, शतावरी, तिरडा, बेरडा, आवळा, पांढरी गुंज, सर्पगंधा, नागदौंड, कोकर्ण, सिसम, आयुर्वेदीय पुदिना, बेल, रुद्राक्ष, सागरगोटा, रिठा, इन्श्युलिना, पानफुटी, समुद्रशोषवेल, अमृतवेल-कृष्णतुळस, पत्थरचट्टा, गुग्गळसह एकूण २८२ औषधी वनस्पतीचे रोपण-संवर्धन व संरक्षण करण्यात आले आहे. मका-हरभरा, भुईमूग, दुधी भोपळा, लसूण, कांदा व भाजीपाल्याची येथे निर्मिती व विक्री केली जाते. त्यासाठी फक्त सेंद्रिय खताचा वापर करण्यात येत असल्यामुळे उत्पादित माल विषयुक्त असल्याचे अनंत झांबरे यांनी पुढे बोलताना निक्षून सांगितले. हास्य क्लब सदस्यांच्या समवेत परिसरात फेरफटका मारताना अनंत झांबरे यांनी अनेक औषधी वनस्पतींचे, दुर्मिळ औषधी वनस्पतींचे दर्शन घडविले. कोणत्या औषधी वनस्पतीमुळे कोणते रोग बरे होतात, त्यासाठी औषधाची मात्रा किती व किती वेळा घ्यावी याबद्दल त्यांनी तपशीलवार माहिती देऊन उद्बोधक मार्गदर्शन केले.
अॅक्युप्रेशरच्या प्रात्यक्षिकासाठी १२०० फूट लांब व तीन फूट रुंदीच्या गोलगोटय़ाच्या ट्रॅकवरून फेरफटका मारण्यात आला. अॅक्युप्रेशर उपचार पद्धतीतून होणाऱ्या लाभाची त्यांनी सखोल माहिती दिली. या प्रसंगी संगीत भजनाच्या तालावर त्यांनी अनुलोम-विलोम, कपालभारती, भ्रामरी हे योगाचे प्रकार. काही सूक्ष्म व्यायाम, तसेच विविध हास्य प्रकार करून दाखविले व त्यामुळे शरीरस्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून होणारे लाभ विशद केले. दर्शविलेले योग प्रकार, व्यायाम व हास्य प्रकार उपस्थितांकडून त्यांनी करून घेतले. योग आयुर्वेद हे ५००० वर्षांपूर्वीचे शास्त्रस्वास्थ्याने जीवन जगण्याची कला शिकविते. ही नुसती उपचारपद्धती नसून जीवनपद्धती असल्यामुळे नियमित योग व प्राणायाम करा. पंचकर्माद्वारे आपल्या शरीराची व मनाची संपूर्ण शुद्धी होते. त्यामुळे निरोगी जीवन जगत असताना अधूनमधून पंचकर्म करण्यावर भर द्या, असा सल्लाही त्यांनी दिला.
आहारशास्त्रावर बोलताना अनंत झांबरे यांनी उपस्थितांना अंतर्मुख करून सोडले. जिभेचे चोचले पुरवू नका व वासनांच्या अधीन जाऊ नका हे सोदाहरण स्पष्ट करताना रसना व वासनामध्ये फसाल तर अनेक व्याधींचे बळी पडाल. प्रसंगी अल्पायुषी ठराल, असा गर्भित इशाराही त्यांनी दिला. नाष्टय़ामध्ये गहू-बाजरी, हिरवे मूग एकत्रित केलेल्या दलियाचा वापर करा. चवीपुरते मीठ घ्या. पेरू-पपई, सफरचंदासारखी निर्दोष फळे खा. साखर, मैदा, वज्र्य करा. दुपारचे झोपू नका. जर्सी गाईचे दूध टाळा. पाणी घोट घोट प्या. दिवसामध्ये १५ क्लास पाणी प्या. उभे राहून पाणी पिऊ नका. वयाची ५० वर्षे झाली की एक वेळचेच जेवण करा. हिरव्या पालेभाज्या खाण्यावर भर द्या. सकारात्मक दृष्टीने जगा.
कोणाचा द्वेष-मत्सर करू नका. समाधानी राहा, असे त्यांनी शेवटी स्पष्ट केले. या भेटीत सांस्कृतिक कार्यक्रम झाले. हास्य क्लबचे अध्यक्ष बाबुभाई ओसवाल व योगतज्ज्ञ जयमाला पाटील यांनी आरोग्य सहल उद्दिष्टपूर्तीची ठरली, असे सांगितले. उत्कृष्ट आयोजनाबद्दल जांभरे दाम्पत्यांचे आभार मानले.