राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे, अशी टिपण्णी विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली होती. त्यांच्या या विधानानंतर राजकारण पहायला मिळत आहे. लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी देखील प्रवीण दरेकर यांना इशारा दिला आहे. १६ सप्टेंबरला सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. दरम्यान सुरेखा पुणेकर यांच्या पक्षप्रवेशावरुन प्रवीण दरेकर यांनी टोला लगावला आहे.
एबीपी माझासोबत बोलतांना सुरेखा पुणेकर म्हणाल्या, “राष्ट्रवादी काँग्रेस हा महिलांचा आदर करणारा पक्ष आहे. प्रवीण दरेकर फार चुकीचं बोलले. त्यांना महिलांचा आदर करता येत नसेल तर अवहेलना तरी करु नका. त्यांनी जाहीर माफी मागावी. अन्यथा त्यांना खूप त्रास होईल”
“सगळ्या पक्षांमध्ये लोककलावंत आहेत. माझा पक्षप्रवेश आहे म्हणून दरेकर असे का बोलले. दरेकरांच्या वक्तव्यामुळे लावणी क्षेत्रातील स्त्रियांना खूप वाईट वाटलं. माझ्यासारखी महिला एवढ्या कष्टाने जर घडत असेल. मात्र आज दरेकरांसारखे विरोधी पक्षनेते असे विधान करतात, हे चुकीचे आहे. भाजपा सारख्या पक्षात प्रवीण दरेकर सारखे नेत्यांचा काही उपयोग नाही.”, असे सुरेखा पुणेकर म्हणाल्या.
प्रवीण दरेकरांनी काय म्हटलं
आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात रामोशी समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना प्रवीण दरेकरांनी सुरेखा पुणेकरांचं नाव न घेता टीका केली. “राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे,” असा टोला प्रवीण दरेकरांनी यावेळी लगावला. “या पक्षाला गरीबांकडे पहाण्यासाठी वेळ नाही. सुभेदार, कारखानदार, बँका आणि उद्योगपतींचा पक्ष आहे,” अशी टीकाही यावेळी त्यांनी केली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचं उत्तर
प्रवीण दरेकरांच्या या टीकेला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी उत्तर दिलं आहे. “आपल्या बोलण्यातून वैचारिक दारिद्र्य दिसून येत असून संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. आपल्या पक्षातील काही महिला बाहेर फिरताना आपण महिलांचा कैवारी आहोत दाखवण्याचा प्रयत्न करतात, आज मला त्यांची कीव येते. तुमच्या बोलण्यामुळे तुमच्या पक्षाची काय संस्कृती आहे ती दिसून आली. प्रवीण दरेकर तुम्ही ज्या प्रकारचं वक्तव्य केलं त्याबद्दल तुम्ही महिलांची माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष महिलांचा अपमान करणाऱ्यांचं गाल आणि थोबाड रंगवून दाखवू शकतं,” असा इशारा रुपाली चाकणकर यांनी दिला आहे.