लोकसत्ता प्रतिनिधी
सांगली : लावणी ही लोककला लोकसाहित्याबरोबर लोककलेत अधिक लोकप्रिय झाली असल्याचे प्रतिपादन लोकसाहित्याच्या अभ्यासक आणि दिल्ली येथे होणाऱ्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी सांगली येथे केले.
प्रा. डॉ. आबासाहेब शिंदे यांच्या ‘लावणी : रूप आणि आविष्कार’ या संदर्भग्रंथाचे प्रकाशन श्रीमती डॉ. भवाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी त्या बोलत होत्या. साहित्यिक महेश कराडकर यांनी प्रास्ताविक केले, तर प्रा. डॉ. शिंदे यांनी स्वागत केले. या वेळी मोहन खोत, प्रा. डॉ. विष्णू वासमकर, चित्रकार राहुल टिंगरे आदी प्रमुख उपस्थित होते.
डॉ. भवाळकर पुढे म्हणाल्या, ‘सांगली जिल्ह्यातील शाहिरांनी लावणीरचना अतिशय उत्कृष्ट व सुंदर लिहिल्याने लावणी अधिक समृद्ध झाली. यामुळे तिला लोकप्रियता मिळाली.’ डॉ. शिंदे म्हणाले, ‘स्वातंत्र्योत्तर कालखंडात तमाशाबरोबर मराठी चित्रपटामुळे लावणी अधिक लोकप्रिय व लोकाभिमुख झाली असून, सांगली जिल्ह्यातील शाहिराचे लावणीरचनेत मोठे योगदान आहे.’
कराडकर म्हणाले, ‘जिल्ह्यातील शाहिरांनी आपल्या दमदार शाहिरी सादरीकरणाच्या माध्यमातून सांगली जिल्ह्याचा महाराष्ट्रात नावलौकिक मिळवून सांगलीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.’