वर्धा श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित ‘लावण्य संध्या’ या लोककलेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमातून ग्रामीण जीवनाचे लोभस वास्तव मांडण्यात आले. सावंगी येथील मेघे सभागृहात हा कार्यक्रम सादर करण्यात आला. कोल्हापूर, पुणे व मुंबई येथून आलेल्या ५२ कलाकारांनी लावण्यासंध्या फुलविली.
महाराष्ट्रातील सणवार, शेतकऱ्यांची दैनंदिनी, गावातील वासुदेव, ओवी गात जात्यावर दळण दळणारी महिला, भूपाळी अशा बहुरंगी उपक्रमांनी कार्यक्रम रंगत गेला. वासुदेवाची गाणी अनेक जेष्ठ रसिकांना भूतकाळात नेणारी ठरली. शेतकऱ्यांची सकाळ, न्याहारी घेऊन येणारी घरधणीन, शेतातून परतणाऱ्या घरमालकाकडे कोल्हापुरी साज आणण्याची विनवणी करणारी स्त्री, बाजीप्रभूंचा पोवाडा, एकनाथांचे भारूड व आई भवानीचा गोंधळ या कार्यक्रमांना रसिकांचा लक्षणीय प्रतिसाद लाभला. लावण्य संध्येच्या समारोपप्रसंगी सर्व कलाकारांनी सादर केलेला नृत्याविष्कार लक्षवेधी ठरला.
या सर्व कलाकारांचा युवा नेते समीर देशमुख यांच्या हस्ते व राजेंद्र शर्मा, संजय इंगळे तिगावकर, विट्ठल मेघे यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. पत्रकार संघाचे आनंद इंगोले, प्रफु ल्ल व्यास व राजेंद्र मुंढे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.

Story img Loader