Lawrence Bishnoi Latest Update: मुंबईत शनिवारी रात्री बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यामुळे मुंबईसह महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत तीन जणांना अटक केली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगनं बाबा सिद्दिकींच्या हत्येची जबाबदारी घेतल्याची एक पोस्ट व्हायरल झाली आहे. ही पोस्ट लिहिणाऱ्यालाही पोलिसांनी अटक केली आहे. पण या पोस्टमुळे लॉरेन्स बिश्नोईचं सलमानबद्दलचं वैर ते त्याच्याशी बाबा सिद्दिकींच्या मैत्रीमुळे त्यांची हत्या असं थेट कनेक्शन जोडलं जात आहे. पण आता या सगळ्या घडामोडींवर चित्रपट निर्माते-दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी खोचक शब्दांत केलेली पोस्ट व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय घडलंय मुंबईत?

मुंबईच्या वांद्रे परिसरामध्ये झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयाजवळच बाबा सिद्दिकी यांच्यावर शनिवारी रात्री ११.३० च्या सुमारास तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. त्यातली एक त्यांच्या छातीत घुसली. त्यांना तातडीनं लीलावती रुग्णालयात दाखल केलं. पण तिथे त्यांचा मृत्यू झाल्याचं जाहीर करण्यात आलं. यापाठोपाठ पोलिसांनी वेगानं तपासाला सुरुवात केली. हत्या झाल्यानंतर पुढच्या काही वेळातच पोलिसांनी त्यातल्या दोन हल्लेखोरांच्या मुसक्या आवळल्या. हे हल्लेखोर हरियाणा व उत्तर प्रदेशचे असल्याची माहिती समोर आली आहे.

एकीकडे तपास चालू असताना दुसरीकडे लॉरेन्स बिश्नोई गँगनं या हत्येची जबाबदारी स्वीकारल्याची पोस्ट शुभम लोणकर नावाच्या एका व्यक्तीने सोशल मीडियावर केली. शुभम लोणकर लॉरेन्स बिश्नोई गँगचा समर्थक असल्याचं समोर आलं आहे. या पोस्टमध्ये सलमान खानशी मैत्री किंवा संबध असल्यामुळेच बाबा सिद्दिकींची हत्या केल्याचं नमूद करण्यात आलंय. तसेच, सलमानशी संबंधित इतरांनाही इशारा देण्यात आला आहे.

बिश्नोई गँग सलमान खानच्या मागे का?

१९९८ साली सलमान खाननं राजस्थानमध्ये दोन काळवीटांची शिकार केली होती. बिश्नोई समाज काळवीटाला पवित्र मानतो. त्यामुळे या शिकारीपासून बिश्नोई समाजाकडून सलमान खानला सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर तिथून सलमान खानची जामिनावर सुटका झाली. पण लॉरेन्स बिश्नोईनं आपला सलमान विरोध कायम ठेवला. त्याचाच एक भाग म्हणून बाबा सिद्दिकींची हत्या झाल्याचं आता बोललं जात आहे.

Lawrence Bishnoi Video: बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोईचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल; पाकिस्तानी गँगस्टर शाहजाद भट्टीला तुरुंगातून केला होता Video कॉल!

राम गोपाल वर्मांची खोचक पोस्ट!

दरम्यान, चित्रपट निर्माते व दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर या सगळ्या घडामोडींवर एक पोस्ट केली आहे. “एका पूर्वीचा वकील असणाऱ्या गँगस्टरला (लॉरेन्स बिश्नोई) एका हरणाच्या मृत्यूचा बदला एका सुपरस्टारची (सलमान खान) हत्या करून घ्यायचा आहे. त्यासाठी इशारा म्हणून तो त्याच्या ७०० जणांच्या गँगमधून, ज्यांची भरती त्यानं फेसबुकवरून केली आहे, काहींना आधी अशा मोठ्या राजकीय नेत्यांना जीवे मारण्याचे आदेश देतो, जे त्या सुपरस्टारचे जवळचे मित्र आहेत”, असं आपल्या पोस्टमध्ये राम गोपाल वर्मांनी म्हटलं आहे.

“या गँगस्टरला पोलीस पकडू शकत नाहीत कारण पो तुरुंगात सरकारच्याच संरक्षणात आहे. त्याचे प्रवक्ते विदेशातून आख्ख्या गँगचा कारभार हाकत आहेत… जर एखाद्या बॉलिवुडमधल्या लेखकानं या सगळ्यावर एखादी चित्रपटाची कथा लिहिली, तर बॉलिवुडचे लोक त्याला सर्वात अविश्वसनीय आणि सर्वात फालतू कथा लिहिली म्हणून बदडतील”, असा टोला राम गोपाल वर्मा यांनी पोस्टच्या शेवटी लगावला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lawrence bishnoi claims killing of baba siddique salman khan ram gopal varma x post pmw
Show comments