विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात ठाकरे गटाच्या विरोधात निकाल दिल्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने पोलखोल महा पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. वरळी डोम सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. यावेळी वकील असीम सरोदे यांनी शिवसेनेत फूट पडल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात काय काय झालं? त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाविरोधात कसा निकाल घेतला? याबद्दल विस्तृतपुणे कायदेशीर विवेचन केले. हे करत असताना त्यांनी राज्याच्या माजी राज्यपालांचा सर्वात फालतू माणूस असा उल्लेख केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वकील असीम सरोदे म्हणाले की, विधानसभा अध्यक्षांच्या निकालाची चिरफाड करणं आवश्यक आहे. लोकशाही कशी मारली जाते, हे यातून दिसणार आहे. लोक माझ्यासारख्या वकिलांना म्हणतात की, तुम्ही वकील आहात, राजकारणावर बोलू नका. भारतीय संविधान एक राजकीय दस्ताऐवज आहे. राज्यव्यवस्था म्हणून भारत कसा चालेल, याविषयीचं ते राजकीय दस्ताऐवज आहे. अगदी नागरिक असणंही राजकीय संकल्पना आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने राजकारणावर बोललं पाहिजे.

हे वाचा >> राहुल नार्वेकरांच्या निकालावर असीम सरोदेंचं मुद्देसूद उत्तर; व्हीपपासून विधिमंडळ पक्षापर्यंत सर्व मुद्द्यांचा केला समावेश!

मी ठाकरेंची बाजू मांडत नाही..

उबाठा गटाने आयोजित केलेल्या खुल्या पत्रकार परिषदेते बोलत आहे, म्हणून मी ठाकरेंची बाजू मांडतोय, असे अजिबात समजू नका, असेही सरोदे यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे संविधानाच्या बाजूने आहेत, म्हणून मी त्यांच्या बाजूने आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

पक्षांतर बंदी कायद्याच्या उद्देशाला हरताळ

शिवसेना फुटीनंतर सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत घटनेच्या दहाव्या परिशिष्टाचा म्हणजेच पक्षांतर बंदी कायद्याचा उल्लेख झाला. हा कायदा पक्षांतर करण्यासाठी नसून पक्षांतर रोखण्यासाठी आहे, असे सांगून सरोदे म्हणाले की, या कायद्याच्या उद्देशालाच हरताळ फासण्याचे काम झाले आहे. सत्ताधाऱ्यांनी आपल्या पद्धतीने या कायद्याचा अर्थ लावून आपले अन्यायकारक कृत्य झाकले, अशी टीका त्यांनी केली.

पक्षांतर बंदी कायद्यातील कलम १ ब चे उदाहरण देताना सरोदे यांनी विधीमंडळ पक्ष आणि कलम १ क नुसार राजकीय पक्षाच्या व्याख्या काय आहेत? याची माहिती दिली. “विधिमंडळ पक्षाचं आयुष्य ५ वर्षांचं असतं. त्यामुळे ती अस्थायी स्वरुपाची व्यवस्था आहे. त्यामुळे कायद्यात विधिमंडळ पक्षाला महत्त्व नाही. मूळ राजकीय पक्षाला महत्त्व आहे. इथे मूळ राजकीय पक्ष शिवसेना आहे, बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेला आहे”, असे सरोदे म्हणाले.

Maharashtra Breaking News Live: “राहुल नार्वेकरांनी तेव्हा राजीनामा दिलाच नाही”, असीम सरोदेंनी ठेवलं ‘या’ मुद्द्यावर बोट!

राज्यपाल फालतू माणूस…

सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीबाबत बोलत असताना सरोदे यांनी न्यायाधीशांनी राज्यपालांबाबत केलेल्या एका टिप्पणीची आठवण करून दिली. “राज्यपालांनी या राज्यातील सरकार उलथवून लावण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली”, अशा शब्दात घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीवर सर्वोच्च न्यायालयाने कडक ताशेरे ओढले होते. याबद्दल असीम सरोदे यांनी माजी राज्यपालांना फालतू माणूस म्हटले. त्यावेळी महाराष्ट्रात भगत सिंह कोश्यारी राज्यपाल पदावर होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lawyer asim sarode slams maharashtra assembly speaker rahul narwekar and former governer at shiv sena uddhav thackeray press conference kvg
Show comments