Jalana Crime News: जालना शहरातील एका वकिलाच्या घरात तब्बल तीन वेळा चोरी झाल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी पीडित वकिलाने पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही चोरटे काही पोलिसांच्या हाती लागले नाहीत. शेवटी या वकीलाने स्वतःच घराच्या भिंतीवर चोरट्यांसाठी भलं मोठं पत्र लिहून चोरी न करण्याचं आवाहन केलं चोऱ्यांचं सत्र कायमचं थांबलं.

जालन्यातील एस.टी कॉलनीत वकील ललित हट्टेकर यांचं वडिलोपार्जित घर आहे. याच घरात ५ महिन्यांपूर्वी चोरट्यांनी हात साफ करत सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह एकूण १० लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता. ॲड. हट्टेकर यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली. पण चोरटे काही केल्या पोलिसांच्या हाताला लागले नाहीत.

या घटनेनंतर ॲड. हट्टेकर यांच्या घरात २ वेळा पुन्हा चोरी झाली. या दोन्हीही चोरीच्या घटनेत चोरट्यांच्या हातात काहीच पडलं नाही. पण हट्टेकर यांचं कुटुंब सततच्या चोऱ्यांमुळे भयभीत झालं होतं. घराचे दरवाजे, कडीकोयंडा यांचंही नुकसान झालं होतं. या चोरीच्या घटनांमुळे हट्टेकर हतबल झाले आणि त्यांनी अनोखी शक्कल लढवली. त्यांनी घराच्या भिंतीवर चोरट्यांना एक पत्र लिहिले आणि त्यांना चोरी न करण्याचं आवाहन केले.

या पत्रात ॲड. ललित हट्टेकर यांनी लिहिलं की, “माननीय चोरसाहेब, सस्नेह नमस्कार. जोखीम त्याचप्रमाणे तंत्रज्ञान, समन्वय आणि जीवावर उदार होऊन, आपण करीत असलेल्या कलेला वंदन. आपली ओळख नाही. परंतु तीन चोऱ्यांच्या वेळी आपल्या वाटेस निराशा आली असेल. एक वेळेस मात्र, आपण माझ्या आयुष्यभराची कमाई घेऊन गेलात. पत्नी आणि मुलासह घरात राहतो. घरात सोने-चांदी तसेच पैसे नाहीत. भांडीकुंडी, वॉशिंग मशीन आणि इतर सामान आहे. त्यामुळे घरफोडी करून माझा आणि तुमचा वेळ वाया घालवू नका.

या पत्रात हट्टेकर यांनी पुढे म्हटले आहे की, “कडी-कोयंडे तोडल्यामुळे माझे नुकसान होते. चोरीसाठी तुम्हाला ही जागा आदर्श वाटत असेल. मोठी रक्कम दिल्यावर हे घर तुम्हाला विकू शकतो. मग तुम्ही तेथे अवैध धंदे करू शकाल.”

दरम्यान चोरांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात ॲड. हट्टेकर यांनी त्यांच्याडे शस्त्र परवाना असल्याची जाणीवही चोरट्यांना करून दिलेली आहे.

हट्टेकर यांनी हे पत्र लिहून दिड महिना झाला आहे. दिड महिन्यात त्यांच्या घराकडे चोरटे फिरकलेही नाहीत. त्यामुळे हे पत्र लिहून फायदाच झाला, असा दावा हट्टेकर यांनी केला आहे.

जालन्यात शहरी भागासह ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांचा धुमाकूळ सुरु आहे. या चोऱ्यांच्या गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना अपयश येत आहे. महिनाभरात जिल्ह्यात शेकडो चोऱ्या झाल्या आहे. अशा चोरट्यांना ॲड. हट्टेकर यांनी पत्र लिहून त्यांच्या पध्दतीने धडा शिकवला. त्याचीच सध्या शहरात चर्चा सुरु आहे.