वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत राहणारे राज्याचे पाणीपुरवठामंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांचे संपर्कमंत्रिपद काढून घेण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला असून पर्यावरण राज्यमंत्री सचिन अहीर यांची या जिल्ह्य़ाचे संपर्कमंत्री म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
गेल्या चार वर्षांपासून ढोबळे या जिल्ह्य़ाचे संपर्कमंत्री होते. एक महिन्यापूर्वी ढोबळे यांनी या जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर असताना घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत राज्यातील आघाडी सरकारला चक्क नापास ठरवले होते. आघाडी सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरले असून हे नापासांचे सरकार आहे. मीसुद्धा नापास मंत्री आहे, अशी टीका त्यांनी तेव्हा केली होती. ढोबळे यांनी याच पत्रकार परिषदेत येथील जिल्हाधिकारी विजय वाघमारे यांच्यावरही टीका केली होती. या टीकेचे संपूर्ण राज्यात तीव्र पडसाद उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित मंत्र्यांच्या बैठकीत अनेक मंत्र्यांनी नापासच्या मुद्दय़ावरून ढोबळे यांना जाब विचारला होता. या पाश्र्वभूमीवर आता पक्षाने ढोबळे यांच्याकडील संपर्कमंत्रिपदाची जबाबदारी काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रवादीत या जिल्ह्य़ात अनेक गट आहेत. या गटांमध्ये समन्वय ठेवण्यात ढोबळे यांना यश आले नाही. त्यामुळेही त्यांना या जिल्ह्य़ाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आल्याची चर्चा राष्ट्रवादीच्या वर्तुळात आहे. आता ढोबळे यांच्याऐवजी पक्षाने पर्यावरण राज्यमंत्री सचिन अहीर यांना या जिल्ह्य़ाच्या संपर्कमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली आहे. या जिल्ह्य़ाचे पालकमंत्री संजय देवतळेसुद्धा पर्यावरण खात्याचे मंत्री आहेत. या नव्या निर्णयामुळे एकाच खात्याच्या मंत्री व राज्यमंत्र्यांवर एकाच जिल्ह्य़ाचे पालकत्व सांभाळण्याची जबाबदारी येऊन पडली आहे.

Story img Loader