ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, या मागणीसाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे उपोषण केलं. लक्ष्मण हाके यांच्या मागण्यासंदर्भात सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी त्यांचं उपोषण स्थगित केलं. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणासंदर्भात भाष्य केलं. तसेच मनोज जरांगे पाटील यांच्यावरही टीका केली. “झुंडशाहीच्या बळावर आरक्षणाची मागणी करणं घटनाविरोधी आहे”, असं म्हणत लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लक्ष्मण हाके काय म्हणाले?

“कुठल्यातरी एका व्यक्तीने झुंडशाहीच्या जोरावर सर्व लोकांना एकत्र करून मला आरक्षण मिळालं पाहिजे, मी आरक्षण घेणारच, का देत नाहीत? दुसऱ्यांना आरक्षण आहे, मग आम्हाला का नाही? असं म्हणणं म्हणजे हे घटना विरोधी वक्तव्य आहे. लोकशाहीच्या मलभूत तत्वाचा हा अवमान आहे. ही हुकूमशाही वृत्ती आहे. अशा प्रकारची मागणी उद्या आणखी कोणी केली तर त्याचं उत्तर हे महाराष्ट्रातील वातावरण बिघडण्यास कारणीभूत ठरेन”, असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं.

हेही वाचा : मनोज जरांगेंचं आवाहन, “मी एकटा पडलो आहे आणि मराठा जात संकटात, तेव्हा…”

कायद्याचे ज्ञान असूनही काहीजण गप्प बसलेत का? यावर बोलताना हाके म्हणाले, “मंत्री, खासदार, आमदार, या सर्व लोकांना माझी विनंती आहे. तुम्ही ज्यावेळी लोकनियुक्त कायद्याच्या सभागृहात जात असता त्यावेळी मराठा आरक्षणासंदर्भात न्यायमूर्ती बी.एच.मारलापल्ले यांचं एक जजमेंट आहे. या जजमेंटचा अभ्यास करायला हवा. न्यायमूर्ती बी.एच.मारलापल्ले यांनी म्हटलं आहे की, मराठा आणि कुणबी एकच आहेत असं म्हणणं म्हणजे सामाजिक मुर्खपणा होय. त्यामुळे या जजमेंटचा अभ्यास करावा. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भात एक जजमेंट दिलेलं आहे. त्या जजमेंटमध्ये महाराष्ट्रातील सर्व सामाजिक स्थितीबद्दल सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे त्याचाही अभ्यास केला पाहिजे”, असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं.

“मराठवाड्यातील ५ ते ६ खासदारांनी पत्र दिलं. अशा प्रकारचं पत्र दिल्यानंतर कायदा बनवायला जाणाऱ्या लोकांनी जर कायद्याची थोडीफार माहिती घेतली नसेल तर हे धोकादायक आहे. मनोज जरांगे काय कुठल्या शब्दाचा अर्थ काढतील? अलीकडच्या काळातील त्यांचे विधान पाहता ते काही बोलू शकतात”, अशी लक्ष्मण हाके यांनी केली.

भुजबळांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला

दरम्यान, छगन भुजबळांच्या एका वक्तव्याबाबतही लक्ष्मण हाके यांनी भाष्य केलं. छगन भुजबळ यांनी बोलताना दिलबर के लिए दिलदार है हम, दुष्मन के लिए तलवार है हम, असं म्हटलं होतं. यावर बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले की, ‘छगन भुजबळ यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला. शायरीचा उद्देश असा असतो की, त्याचा फक्त मतितार्थ घ्यायचा असतो. पुढच्या माणसांचा विश्वास संपादन करण्यासाठी किंवा माणूस त्या माध्यमातून काहीतरी उदाहरण देत असतो. त्यामुळे छगन भुजबळ यांनी एखादे वाक्य बोलले म्हणजे उद्या ते तलवारी काढणार, असा त्याचा अर्थ काढणं चुकीचं आहे. या देशात कायद्याचं राज्य आहे. मात्र, अशा पद्धतीचा अर्थ घेऊन काही वक्तव्य करायचं हे चुकीचं आहे’, असंही लक्ष्मण हाके यांनी यावेळी स्पष्ट केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Laxman hake full pc on obc reservation maratha reservation and manoj jarange patil gkt
Show comments