Laxman Hake : संभाजीराजे छत्रपती यांनी वाघ्या कुत्र्याचं स्मारक रायगडावरुन हटवावं, इतिहासात वाघ्या कुत्र्या असल्याचे पुरावे नाहीत. हे शिल्प कपोल कल्पित आधारावर तयार करण्यात आलं आहे असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. यासाठी त्यांनी ३१ मे पर्यंतची मुदत दिली आहे. मात्र यावरुन वाद होण्याची चिन्हं आहेत. कारण धनगर समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी वाघ्या कुत्र्याचं स्मारक हटवण्यास विरोध दर्शवला आहे.
लक्ष्मण हाके यांनी काय म्हटलं आहे?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरील समाधीच्या समोर जे वाघ्या या कुत्र्याचं स्मारक आहे ते हटवण्यासाठी संभाजीराजे छत्रपतींनी ३१ मार्चपर्यंतच अल्टिमेटम दिला आहे. त्या संदर्भात तमाम ओबीसी आणि धनगर समाजाकडून माझी ही विनंती आहे की संभाजी राजे यांनी किल्ल्याचं संवर्धन केलं पाहिजे. मात्र रायगडची नासधूस ते करत आहेत. कुत्र्याचं स्मारक हटवण्यास आमचा विरोध आहे.
संभाजीराजे वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न करत आहेत-हाके
आमचा दुसरा प्रश्न हा आहे की संभाजी राजेंनी ३१ मे ही तारीख का निवडली? यावर आमचा आक्षेप असा आहे की ३१ मे रोजी मातोश्री पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती असते. यावेळची जयंती ही त्रिशतकोत्तर आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी पंतप्रधानांना आणण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. त्याआधीच संभाजीराजे भोसलेंनी ३१ मे चा अल्टिमेटम का निवडला आहे हा आमचा प्रश्न आहे. विशाळगडाप्रमाणे वाघ्याच्या समाधीकडे लक्ष वेधून घेऊन महाराष्ट्रातलं वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न संभाजीराजे करत आहेत असा आमचा आरोप आहे.
इतिहासकार आणि संभाजीराजेंना लोकमान्य टिळक, महात्मा फुले यांच्या हेतूबाबत शंका आहे का?
२०१२ मध्ये वाघ्याचा पुतळा संभाजी ब्रिगेडने काढून दरीत फेकला होता. त्यावेळी गृहमंत्री असलेल्या आर. आर. पाटील यांनी तो पुतळा आहे त्या ठिकाणी परत बसवला होता. आता संभाजीराजे आणि संभाजी ब्रिगेड यांनी जो उपक्रम हाती घेतला आहे त्याला आमचा विरोध आहे. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जिर्णोद्धार झाला त्यावेळी लोकमान्य टिळकांच्या अध्यक्षतेखाली ही समिती बसली होती, महात्मा ज्योतिराव फुलेही अध्यक्ष होते. तृतीय तुकोजीराव होळकर यांनी त्या समाधीसाठी आर्थिक मदत केली होती. छत्रपती शिवाजी मिलेट्री स्कूल या समोर जो पुतळा बांधला गेला त्यालाही होळकरांनी मदत केली होती. त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की ही जी त्यावेळची मंडळी होती त्यांच्याबाबत आणि त्यावेळच्या स्मारक समितीबाबत संभाजीराजे आणि काही इतिहासकारांना शंका आहे का? या सगळ्यांनी ज्या भावनेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जिर्णोद्धार केला ती भावना महत्त्वाची आहे.
रायगड विकास प्राधिकरणावरुन संभाजीराजेंची हकालपट्टी करा-हाके
रायगड विकास प्राधिकरणावरुन संभाजीराजे भोसले यांची हकालपट्टी व्हावी, विशाळ गडाची नासधूस त्यांनी केली आहे. आता वाघ्या कुत्र्याच्या समाधीची नासधूस करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. जर असं काही घडलं तर आमचा म्हणजेच तमाम धनगर समाजाचा त्याला विरोध असेल. छत्रपती संभाजी राजेंनी जे टायमिंग निवडलं आहे ते पू्र्णपणे चुकीचं आहे, त्यांच्या हेतूविषयी आमच्या मनात शंका आहे. वाघ्या प्रकरणाबाबत इतिहासात चांगला अभ्यास असणारे संजय सोनवणे आमच्याबरोबर आहेत, ते तुम्हाला माहिती देतील.
संजय सोनवणे काय म्हणाले?
वाघ्याचा पुतळा संभाजी ब्रिगेडने दरीत फेकला होता. त्यावेळी मी अनेक पुरावे उपस्थित केले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं होतं. मात्र २४ तासात तो पुतळा बसवला गेला होता. वाघ्या काल्पनिक आहे असे दावे केले जातात. मात्र वाघ्याचा पुरावा हा शिवकालीन शिल्पाच्या रुपाने जतन केला गेला आहे. गदग या ठिकाणी एक शिल्प आहे. या शिल्पामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यात शिवाजी महाराज आहेत, त्यांचा अश्व आहे, मावळे दिसत आहेत आणि एक श्वानही दिसतो आहे. शिवाजी महाराजांचा हा श्वान सोबत करत होता म्हणून तो या शिल्पात कोरला गेला आहे. शिवाजी महाराजांच्या हयातीतला हा पुरावा आहे. दुसरा पुरावा जर्मनांनी जपला आहे. १८३४ ते १८५४ या काळात जे ग्रंथ लिहिण्यात आले त्यातल्या ग्रंथात एक प्रकरण आहे त्या प्रकरणात म्हटलं आहे शिवाजी महाराज यांचा मृत्यू १६८० मध्ये झाला. त्यांचं स्मारक रायगड येथे बांधण्यात आले. त्या बाजूलाच एका चबुतऱ्यावर वाघ्याचं स्मारक आहे जो समाधीकडे पाहतो आहे. हाच वाघ्या ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पेटत्या चितेत उडी घेतली होती. असंही सोनवणे यांनी सांगितलं.