Laxman Hake OBC vs Maratha Reservation : मराठा समाजाला कुणबी जातप्रमाणपत्रांसह ओबीसीतून आरक्षण द्यावं ही मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आंतरवाली सराटी या गावात उपोषणाला बसले आहेत. आज (२३ सप्टेंबर) त्यांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे. जरांगे पाटील यांची प्रकृती काल रात्रीपासून खालावली आहे. त्यामुळे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज आंतरवालीला जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. या भेटीवेळी त्यांनी मनोज जरांगे यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच संभाजीराजेंनी मनोज जरांगे यांच्या एका मागणीचं समर्थन केलं. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत विधानसभेत चर्चा व्हायला हवी, असं संभाजीराजे म्हणाले.
संभाजीराजे म्हणाले, “मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारकडे अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे. ही मागणी रास्त आहे असं मला वाटतं. अधिवेशनातून या प्रश्नावर तोडगा निघू शकतो”. तसेच संभाजीराजे मनोज जरांगे यांना म्हणाले, “तुम्ही निवडणुकीत कोणाला पाडायचं बोलू नका, त्यापेक्षा तुम्ही निवडून कसं आणायचं ते पाहा. तुम्ही आमच्याबरोबर आला नाहीत तरी चालेल. मात्र तुम्ही सत्तेत बसलं पाहिजे. सत्ताधारी तुमची व तुमच्या मागण्यांची दखल घेत नसतील तर तुम्हीच सत्तेत या”.
हे ही वाचा >> Majhi Ladki Bahin Yojana : मोठी बातमी! ‘लाडक्या बहिणीं’च्या खात्यात ‘या’ दिवशी जमा होणार तिसरा हप्ता
दरम्यान, संभाजीराजे छत्रपतींनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनस्थळाला भेट दिल्यानंतर ओबीसी आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते लक्ष्मण हाके यांनी संभाजीरांजेंवर टीका केली आहे. “मिस्टर संभाजी भोसले, मी आता तुम्हाला राजा म्हणणार नाही”, असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे. “तुम्ही राजर्षी शाहू महाराजांचे वैचारिक वारस नाही”, असा टोला देखील यांनी लगावला आहे. ते म्हणाले, “आम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना राजे मानतो, इतरांना नाही. कारण रयतेचा राजा छत्रपती शिवरायांचं स्वराज्य निर्माण होण्यासाठी अठरापगड जातींच्या लोकांनी जीवाची बाजी लावली होती. तसेच आम्ही आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचे पाईक आहोत”.
हे ही वाचा >> Dhangar Reservation : “धनगर आरक्षणाची अधिसूचना काढली तर…”, अजित पवार गट आक्रमक; समाजात तेढ निर्माण न करण्याचा सरकारला इशारा
“तुम्हाला राजा मानायची की नाही याबाबत रयतेला विचार करावा लागेल”
दरम्यान लक्ष्मण हाके म्हणाले, “मनोज जरांगे, संभाजी भोसले किंवा अन्य कोणीही येऊ द्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची चौकट, त्यातील निकष पूर्ण केल्याशिवाय कोणालाही आरक्षण देता येणार नाही. राजा आता राणीच्या पोटी जन्म घेत नाही. राजा आता मतपेटीतून जन्माला येतो. त्यामुळे संभाजी भोसलेंना मी सांगू इच्छितो की आम्ही फक्त छत्रपती शिवरायांना राजा मानतो. तुम्ही असं वागणार असाल तर तुम्हाला आम्ही राजा मानायचं की नाही याबाबत रयतेला आता विचार करावा लागेल”.