Laxman Hake Criticize Sharad Pawar : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी बारामतीमधील सभेत बोलताना ज्येष्ठ नेते शरद पवारांवर टीका केली होती. ते म्हणाले होते, “शरद पवारांनी आदेश दिल्यामुळे ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला विरोधी पक्षांचे नेते आले नाहीत.” आता तेच छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीसाठी त्यांच्या घरी गेले. या भेटीवेळी भुजबळांनी शरद पवारांना मराठा-ओबीसी आरक्षणावरून चालू असलेल्या वादात मध्यस्थी करावी आणि राज्यातलं वातावरण सुरळीत करण्याची विनंती केली. भुजबळांसह अनेक ओबीसी नेते मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला महाविकास आघाडी पुरस्कृत आंदोलन म्हणतात. मात्र तेच भुजबळ आता मविआचे नेते शरद पवारांकडे मध्यस्थीसाठी जातात. यावर प्रतिक्रिया देताना भुजबळांची ही भूमिका विरोधाभासी असल्याचं वक्तव्य ओबीसी आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते लक्ष्मण हाके यांनी केलं आहे. तसेच हाके यांनी शरद पवारांच्या भूमिकेबाबतही नाराजी व्यक्त केली आहे.
लक्ष्मण हाके म्हणाले, छगन भुजबळ व शरद पवार हे राज्यातील मोठे नेते आहेत. यांनी राज्यातील ओबीसींचा आक्रोश पाहावा. ओबीसींच्या वेदना जाणून घ्यायला हव्यात. या मोठ्या माणसांनी मुरब्बी, जाणतेपणाची, घटनात्मक व कायदेशीर भूमिका घ्यावी. या माणसांनी पुढे यावं आणि राज्यातलं वातावरण सुरळीत करावं. भुजबळांची भूमिका विरोधाभासी असली तरी मराठवाड्यातील खासदारांची भूमिका तितकीच मनाला वेदना देणारी आहे. मराठवाड्यातील सर्व खासदारांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी मनोज जरांगे पाटील यांना पत्र लिहून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता. परंतु, त्याच खासदारांनी ओबीसी आंदोलनाविषयी चकार शब्द देखील काढला नव्हता. हे लोक आमचं अस्तित्व मान्य करत नाहीत, याची मला खंत वाटते.”
ओबीसी कार्यकर्ते म्हणाले, मनोज जरांगे यांच्या मागण्या बरोबर असू शकतात. बेरोजगारीसह मराठा तरुणांचे इतर प्रश्न घेऊन ते आंदोलन करत आहेत. मात्र मराठा आरक्षणाचा प्रश्न ओबीसी आरक्षणातून सुटेल हे मनोज जरांगे यांना कोणी सांगितलं? एकीकडे ओबीसी नेते म्हणतात की ओबीसींचं आरक्षण संपेल, तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्य सरकार म्हणतंय की ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. यामध्ये नक्की खरं कोण बोलतंय? त्यामुळे छगन भुजबळ, शरद पवार, एकनाथ शिंदे, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पुढे यायला हवं आणि कायदेशीर तथा घटनात्मक पद्धतीने या प्रश्नावर तोडगा काढावा.
शरद पवारांबाबत आम्हा ओबीसींच्या मनात नाराजी : लक्ष्मण हाके
दरम्यान, छगन भुजबळांपाठोपाठ तुम्ही देखील शरद पवारांची भेट घेणार का? असा प्रश्न विचारल्यावर लक्ष्मण हाके म्हणाले, मी खूप छोटा कार्यकर्ता आहे आणि शरद पवार हे संपूर्ण देशाचे नेते आहेत. पवार खूप मोठे नेते असले तरी त्यांना अठरापगड जातीच्या लोकांच्या भावना, वेदना अद्याप समजल्या नाहीत. त्या समजल्या असत्या तर ते इतके दिवस गप्प बसले नसते. त्यांनी उचित भूमिका घेतली असती. मात्र शरद पवारांनी भूमिका घेतली नाही. त्यामुळे मला याबाबत खंत व्यक्त करावीशी वाटते. शरद पवार हे राज्यातलं एवढं उत्तुंग नेतृत्व… त्यांचे कार्यकर्ते त्यांना जाणता राजा म्हणतात… आम्ही देखील त्यांच्याकडे आशेने पाहतो.. मात्र त्या नेत्याने मागील काही काळात आरक्षणाविषयी कोणत्याही प्रकारची भूमिका घेतली नाही. याबाबत मला खेद व्यक्त करावासा वाटतो. आम्हा सर्व अठरापगड जातीच्या लोकांमध्ये शरद पवारांबाबत नाराजी आहे.
हे ही वाचा >> Chhagan Bhujbal : “महायुतीचं नुकसान होईल असं…”, भुजबळ-शरद पवार भेटीवर भाजपाची पहिली प्रतिक्रिया
“पवारांना आम्हा ओबीसींचं प्रतिनिधित्व मान्य नाही”
लक्ष्मण हाके म्हणाले, शरद पवार हे पुरोगामी नेते आहेत. ते नेहमी फुले, शाहू, आंबेडकरांची भाषा बोलत असतात. परंतु, तेच शरद पवार आम्हाला संधी देत नसतील, अठरापगड जातीच्या कार्यकर्त्यांना संधी देत नसतील, आमचं प्रतिनिधित्व मान्य करत नसतील तर ते चुकीचं आहे. शरद पवारांना आम्हा अठरापगड जातीच्या लोकांची वेदना दिसली नाही. त्यामुळे त्यांनी अद्याप ओबीसी आरक्षणाबाबत कुठलीही भूमिका घेतली नाही, त्याबद्दल मला वाईट वाटतं. शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवरचे नेते आहेत. मात्र त्यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठा उमेदवारांना प्राधान्य दिलं. त्यांच्या पक्षाने एकूण १० उमेदवार उभे केले होते, त्यापैकी सात उमेदवार मराठा होते. याचा अर्थ त्यांनीही इतर जातीच्या उमेदवारांना संधी दिली नाही. याबद्दल मला खेद वाटतो.”