प्रसिद्ध लेखक आणि कार्यकर्ते लक्ष्मण माने यांनी लैंगिक अत्याचार आणि बलात्कार केल्याचे आरोप पाच महिलांनी करूनही, पोलिसांना याबाबत पुरावे आणि साक्षीदार ‘मिळत’ नसल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिवाय यामुळे माने मात्र अजूनही ‘मोकाट’ असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
शाळेमधील आपली नोकरी कायम करण्याचे आमिष दाखवून लक्ष्मण माने यांनी आपल्यावर २००३ पासून २०१० पर्यंत सातत्याने बलात्कार केला, तसेच आपला लैंगिक छळही केला असल्याचा आरोप, जकातवाडी येथील शारदाबाई पवार आश्रमशाळेतील तिघा महिला कर्मचाऱ्यांनी रविवारी केला. मंगळवारी याच आश्रमशाळेच्या कोल्हापूर शाखेतील दोघा महिला कर्मचाऱ्यांनीही माने यांच्यावर असाच आरोप केल्यामुळे खळबळ उडाली होती. माने हे सदर आश्रमशाळा चालविणाऱ्या संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष आहेत.
या संस्थेच्या भोसरी (पुणे), उपळी (सातारा), जकातवाडी आणि कोल्हापूर अशा चार शाखा आहेत. मात्र एकही साक्षीदार उपरोक्त आरोपांबाबत बोलण्यास तयार नाही, तसेच या आरोपांबाबत कोणताही विश्वसनीय पुरावा पुढे आलेला नाही, असे सातारा येथील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती देताना अतिरिक्त पोलिस महानिरीक्षक अमोल तांबे यांनी सांगितले की, तीन महिला कर्मचाऱ्यांनी लक्ष्मण माने यांच्या विरोधात बलात्कार केल्याची तक्रार केल्याचे कळताच कोल्हापूर येथील दोघा महिलांनीही पुढे यायचे धाडस दाखवले. या सर्वानी केलेल्या तक्रारींवरून जिथे हे कृत्य घडल्याचा आरोप झाला आहे त्या घटनास्थळाचा पंचनामा पोलिसांनी केला असून याबाबत जबान्याही नोंदविल्या गेल्या आहेत.
लक्ष्मण माने या वृत्तानंतर फरार असून त्यांचा फोनही ‘स्विच ऑफ’ असल्याचे तांबे यांनी सांगितले.
पीडित महिला या ३० ते ३५ वर्षे वयोगटातील असून आश्रमशाळेमध्ये त्या आचारी म्हणून रुजू झाल्या होत्या. तेव्हापासूनच माने त्यांचे लैंगिक शोषण करीत असल्याचा आरोप सदर महिलांनी केला आहे. पोलीस स्थानकात दाखल करण्यात आलेल्या तक्रारींनुसार सातारा येथील आश्रमशाळा आणि पुणे येथील सरकारी विश्रांतिगृहात बलात्कार करण्यात आल्याचे म्हटले आहे. तक्रार करणाऱ्या महिलांपैकी एका महिलेने विश्रामगृहातील ‘ती’ खोली ओळखली असून तिथून पोलिसांनी काही वस्तू ताब्यात घेतल्या आहेत. विशेष म्हणजे आपली नोकरी जाईल या एकाच भीतीपोटी तक्रार करण्यास आजवर पुढे न आल्याचे महिलांनी सांगितले. कामावर रुजू होतानाच आपली तारीख नसलेल्या राजीनामापत्रावर स्वाक्षरी घेण्यात आल्याचा आरोपही पीडित महिलांनी केला.
माने कुटुंबीयांनी सर्व आरोप एका निवेदनाद्वारे फेटाळले आहेत. मात्र लक्ष्मण माने, त्यांचा मुलगा भाई माने यांचा फोन बंद असून सातारा येथील शाळेत जाण्याचा प्रयत्न केला असता प्रवेश नाकारण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा