नांदेड शहरातून दुचाकी चोरुन तिची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या अट्टल दुचाकी चोराच्या एलसीबीच्या पथकाने मुसक्या आवळल्या. सदरील कारवाई सोमवार (दि.१७) रात्री ११ वाजेच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईतून किनवट पोलीस ठाण्यातील दुचाकी चोरीचा एक गुन्हा उघडकीस आला असून, इतर अनेक ठिकाणच्या चोरी झालेल्या दुचाकी प्रकरणांचा छडा लागण्याची शक्यता आहे. संशयितांकडून चोरीचा एक मोबाईल व तब्बल आठ दुचाकी असा एकूण तीन लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
किनवट पोलीस ठाण्यात ४ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजता रेल्वेतील खाजगी कर्मचारी गजानन भ्रमाजी चोले यांची दुचाकी (एम.एच.२६.बीएम.३६२१) चोरीला गेल्याची तक्रार दिली होती. त्यावरून गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान ही चोरी गेलेली दुचाकी सुनील उर्फ बालाजी शत्रू मस्से (वय २४ रा.सावरी, ता.किनवट) हा वापरत असल्याची गोपनीय माहिती खबऱ्याद्वारे ‘एलसीबी’ला मिळाली. त्यानुसार पथकाने तातडीने हालचाली करून सोमवारी रात्री ११ वाजता सावरी येथे जाऊन सदर संशयिताला ताब्यात घेतले.
विश्वासात घेत त्याची चौकशी केली असता, त्याने किनवटसह आजबाजूच्या इतरही तालुक्यातील अनेक दुचाकींची चोरी केल्याची कबुली दिली. तसेच त्याच्याकडे एक चोरीचा मोबाईलही सापडला आहे. पथकाने त्याच्याकडील सुमारे तीन लाख तीन हजाराच्या आठ दुचाकी जप्त केल्या आहेत. सदर आरोपीला किनवट पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास तुकाराम वाडगुरे हे करत आहेत.
ही कारवाई पोलीस निरीक्षक देवीदास चोपडे, पोलीस फौजदार सागर झाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे साईनाथ पूयड, सुरेश घुगे, विलास कदम, संदीप घोगरे, कदम, बिचकेवार, सहा.पोलीस उपनिरीक्षक अप्पाराव राठोड, बाळू कुडमेते आदींनी केली.