लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपने खासदार गोपीनाथ मुंडे यांना बीडमधून उमेदवारी जाहीर केली आहे. आम आदमी पार्टीनेही मुंडेंच्या विरोधात चित्रपट अभिनेता नंदू माधव यांना मदानात उतरवले आहे. नंदू माधव गेवराईचे रहिवासी आहेत. राष्ट्रवादीने अद्याप उमेदवारी जाहीर केलेली नाही. एकूणच बीड लोकसभा निवडणुकीत प्रथमच नेता विरुद्ध अभिनेता, अशी लढत बीडकरांना पाहायला मिळेल.
बीड जिल्हय़ात लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय हालचालींना वेग आला आहे. खासदार गोपीनाथ मुंडे यांनी फोडाफोडीला सुरुवात केली आहे. केजनगर पंचायतचे गटनेते तथा राष्ट्रवादीचे कट्टर समर्थक हारुण इनामदार यांना भाजपमध्ये घेण्यात मुंडेंना यश आले आहे. केज आणि अंबाजोगाईतील राष्ट्रवादीचे इतर काही पदाधिकारी खासदार मुंडेंच्या संपर्कात आहेत. महायुतीच्या महाएल्गार मेळाव्याच्या माध्यमातून खासदार मुंडेंनी आपल्या प्रचाराचा नारळही फोडला आहे. राष्ट्रवादीकडून बीडचा उमेदवार जाहीर करण्यात अद्यापही दिरंगाई होत आहे. राज्यातील १८ उमेदवार राष्ट्रवादीने जाहीर केले आहेत. परंतु बीडचा उमेदवार कोण, याविषयी अजूनही एकमत झालेले नाही. जयदत्त क्षीरसागर आणि सुरेश धस या दोघांचे नाव पुढे केले जात असले तरी श्रेष्ठींनी अद्याप यापकी कोणत्याच नावावर शिक्कामोर्तब केलेले नाही. दुसरीकडे आम आदमी पार्टीने बीड लोकसभेची निवडणूक लढवण्याचे जाहीर करत चित्रपट अभिनेता नंदू माधव यांना मदानात उतरवले आहे. अभिनेता नंदू माधव हे कोणत्या मुद्दय़ावर बीड लोकसभेची निवडणूक लढवतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा