Ambadas Danve and Rahul Shewale : शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. जेपी नड्डा यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल राहुल शेवाळे यांनी अभिनंदन केलं आहे. याशिवाय, आगामी काळात होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरीही दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या भेटीवरून शिवसेना(ठाकरे गट) नेते आणि विधानपरिषद विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी राहुल शेवाळेंवर निशाणा साधला आहे.
“वा राहुल शेवाळेजी, निवडून आलात धनुष्यबाणावर आणि उंबरे झिजवता भाजपाई मंडळींचे? कितीही उंबरे झिजवा, यंदा तुम्हाला तुमच्याच मतदारसंघात आम्ही चितपट करू. गाठ खऱ्या शिवसेनेशी, शिवसैनिकांशी आहे, ध्यानी असू द्या!” असा अंबादास दानवे यांनी ट्वीटद्वारे राहुल शेवाळेंना इशारा दिला आहे.
तर समाजमाध्यमावरून आपल्याविरोधात बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्या दुबईस्थित तरुणीला मज्जाव करावा, या मागणीसाठी खासदार राहुल शेवाळे यांनी मंगळवारी उच्च न्यायालयात धाव घेतली. समाजमाध्यमावरून आपल्याविरोधात बदनामीकारक मजकूर पसरवल्याबद्दल या तरुणीवर कारवाई करण्याचे आदेश सरकारला देण्याची मागणीही शेवाळे यांनी केली आहे.
लग्नाच्या बहाण्याने शेवाळे यांनी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप दुबईस्थित ३३ वर्षीय तरुणीने केला होती. तसेच, शेवाळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. या तरुणीने समाजमाध्यमावरून याबाबतचा मजकूर प्रसिद्ध केला होता. तसेच, ट्विट करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही याबाबत तक्रार केली होती.