Who will be the Leader of Opposition of Maharashtra : राज्यात महाविकास आघाडीतील एकाही घटक पक्षाकडे विधानसभेच्या एक दशांश आमदार नसल्याने विरोधी पक्षनेते पदावरून पेच निर्माण झाला आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाकडे २०, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडे आणि काँग्रेसकडे १६ आमदार असल्याने कोणत्याच पक्षाकडे नियमानुसार विरोधी पक्षनेते पद देता येणार नाही. मात्र, असे असले तरीही शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाकडून विरोधी पक्षनेते पदासाठी मागणी केली जाणार आहे. याबाबत शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे गटनेते भास्कर जाधव यांनी भाष्य केलं आहे.
राज्य विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदासाठी २९ आमदारांचे संख्याबळ आवश्यक आहे. पण कोणत्याच पक्षाकडे २९ आमदार नसल्याने यंदा विधानसभेत विरोधी पक्षनेता नसणार. परंतु, याबाबत भास्कर जाधव म्हणाले, “आम्ही जरूर शपथविधी झाला, विधानसभेच्या अध्यक्षांची निवड झाली, मुख्यमंत्री पदाची शपथ झाली की विद्यमान सरकार आणि विधानसभेच्या अध्यक्षाकडे विरोधी पक्षनेते पद मिळावं याची मागणी करणार आहोत.”
हेही वाचा >> Prithviraj Chavan : विरोधी पक्षनेते पदावरून पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं विधान; म्हणाले, “विधानसभेत आम्हाला…”
एक दशांश आमदार नसतानाही विरोधी पक्षनेते पद मिळू शकते का?
महाविकास आघाडी ही निवडणूक पूर्व आघाडी असल्याने तिन्ही पक्ष एकत्र येऊन विरोधी पक्षनेते पदावर दावा करू शकतात. विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय घेण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांचा असतो. लोकसभेत यूपीएकडे आवश्यक संख्याबळ असतानाही कोणत्याही एका पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने काँग्रेसला २०१४ आणि २०१९ मध्ये विरोधी पक्षनेतेपद नाकारण्यात आले होते. हेच सूत्र भाजपकडून विधानसभेत कायम ठेवले जाईल, अशी चिन्हे आहेत.
संख्याबळ नसतानाही विरोधी पक्षनेतेपद १९८६ मध्ये शरद पवार यांनी समाजवादी काँग्रेस पक्षाचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण केले होते. शरद पवार हे तेव्हा विरोधी पक्षनेते होते. विलिनीकरणारानंतर पवारांना विरोधी पक्षनेतेपद सोडावे लागले होते. तेव्हा विरोधीतील जनता पक्षाचे २० तर शेकापचे १३ आमदार होते. कोणत्याच पक्षाकडे अपेक्षित संख्याबळ नव्हते. पण तत्कालीन काँग्रेस सरकारने जनता पक्ष आणि शेकापकडे विरोधी पक्षनेतेपद सोपविले होते. तेव्हा जनता पक्षाचे निहाल अहमद आणि मृणाल गोरे तर शेकापचे दत्ता पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपद प्रत्येकी वर्षभरासाठी भूषविले होते.
हेही वाचा : यंदा विरोधी पक्षनेतेपद रिक्त? संख्याबळ नसतानाही पूर्वी जनता पक्ष, शेकापला संधी
काँग्रेस सरकारने तेव्हा विरोधकांकडे विरोधी पक्षनेतेपद सोपविण्याचे औदार्य दाखविले होते. दिल्लीतही आप सरकारने भाजपकडे पुरेसे संख्याबळ नसताना विरोधी पक्षनेतेपद दिले होते. राज्यातील महायुतीचे सरकार पुरेसे संख्याबळ नसताना किंवा महाविकास आघाडीचे एकत्रित संख्याबळ मान्य करणार का, हा प्रश्न आहे.