पुसद जिल्हा निर्मितीचा प्रश्न
सत्तेत असो अथवा नसो, विधिमंडळात बोलायचे नाही, असे ठरवलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार मनोहरराव नाईक यांना पुसद जिल्हा निर्मितीच्या मागणीसाठी विधानसभेत बोलण्यास भाग पाडण्याचा पवित्रा पुसद जिल्हा विकास मंचच्या काही नेत्यांनी घेतला आहे.
पुसद जिल्हा निर्मिती हा जनतेच्या अस्मितेचा आणि अतिशय जिव्हाळ्याचा विषय व त्यासाठी प्रचंड आंदोलने झालेली असतांना मुख्यमंत्र्यांनी आर्थिक कारणावरून नकारात्मक भूमिका घेतल्याने या प्रश्नावर लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार मनोहर नाईक यांनी सभागृहात हा विषय लावून धरण्याची गरज आहे. विधिमंडळातील कामकाजाचा मनोहर नाईकांचा इतिहास लक्षात घेता ते सभागृहात क्वचितच बोलतात.
उक्तीपेक्षा कृतीवर त्यांचा विश्वास असला, तरी या प्रकरणी सभागृहात बोलण्याचीच कृती करण्याची वेळ आली आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते राहुल ब्रिगेडचे सदस्य अ‍ॅड. सचिन नाईक यांनी व्यक्त केली आहे. पुसद जिल्ह्य़ासाठी गेल्या मंगळवारी अभूतपूर्व बंद यशस्वी करणाऱ्या सर्वपक्षीय आंदोलनाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन जिल्हानिर्मिती शक्य नसल्याचे संकेत दिले आहेत.
वास्तविक, भाजप सरकार छोटी राज्ये आणि छोटे जिल्हे निर्माण करण्यास अनुकुल आहे. राज्य सरकारने त्याच हेतूने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. या जिल्हा पुनर्रचना समितीने ३१ जुलपूर्वी अहवाल द्यायचा होता, पण समितीला ३ महिन्यांची मुदतवाढ दिलेली असतांना समितीच्या अहवालाची प्रतीक्षा न करताच मुख्यमंत्र्यांनी नकारात्मक भूमिका घेणेच अनाकलनीय आहे.
जर नवे जिल्हे निर्माण करायचेच नसतील तर समिती गठीत करणे, तिला मुदतवाढ देणे, अहवालाची प्रतीक्षा न करणे, तिजोरी रिकामी असल्याचे सांगणे, इतर प्रकल्पांना कोटय़वधीची व्यवस्था करतांना तिजोरी भरली असते काय?, असे अनेक प्रश्न आहेत आणि ते लोकप्रतिनिधी या नात्याने विचारण्याचे कर्तव्य मनोहर नाईकांनी करावे, अशी जनतेची इच्छा असल्याचे सचिन नाईक म्हणाले.
वसंत सहकारी कारखान्याच्या संदर्भातील समस्या असो की, माळ पठारावरील ४२ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो, मनोहर नाईक सभागृहात प्रश्न न विचारता आपल्या पध्दतीने प्रश्न सोडवत असले, तरी पुसद जिल्हा निर्मितीबाबतचा विषय सभागृहाच्या पटलावर येणे जरुरीचे आहे, हे लक्षात घेऊन नाईकांनी मदानात उतरले पाहिजे. प्रसंगी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा सरकारला दिला पाहिजे. मनोहर नाईक सभागृहात बोलतील, अशी अपेक्षा करून सचिन नाईक म्हणाले की, जनभावनेची कदर झाली नाही, तर ते पुसदकरांचे दुदैव ठरेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा