शिवसेनेत उफाळून आलेल्या जुन्या व नवीन पदाधिकाऱ्यांच्या वादाची परिणती माजी जिल्हाप्रमुख सुनील बागूल यांच्या हकालपट्टीत झाल्याचे वृत्त बुधवारी सायंकाळी येऊन धडकल्यानंतर शेकडो बागूल समर्थकांनी एकत्र होत उपरोक्त निर्णयाचा निषेध करतानाच खा. संजय राऊत यांच्यासह पालिकेतील विरोधी पक्षनेते व गटनेते, विद्यमान जिल्हाप्रमुख यांच्याविरोधात तोफ डागली. प्रचंड घोषणाबाजी करत समर्थकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. या घडामोडींमुळे कॅनडा कॉर्नर व रामवाडी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी खबरदारी घेत या भागासह सिडकोत विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयाभोवती बंदोबस्त तैनात केला.
शिवसेनेत स्थानिक पातळीवर दोन ते तीन वर्षांपासून अंतर्गत धुसफूस सुरू आहे. नव्याने दाखल झालेल्यांना वरिष्ठांकडून सढळहस्ते पदे दिली जात असल्याने जुने पदाधिकारी व शिवसैनिक अस्वस्थ आहेत. त्यातून उद्भवलेल्या वादात जुन्या पदाधिकाऱ्यांनी पक्ष कार्यालयाचा ताबा घेऊन समांतर पद्धतीने काम सुरू केले. विद्यमान जिल्हाप्रमुख विजय करंजकर, विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर व गटनेते अजय बोरस्ते यांच्यावर टिकास्त्र सोडत माजी जिल्हाप्रमुख सुनील बागूल व दत्ता गायकवाड, माजी महानगरप्रमुख अर्जुन टिळे यांनी संबंधितांना शिवसेना स्टाईलने धडा शिकविण्याचा निर्धार केला. या घडामोडींची माहिती वरिष्ठांच्या कानी गेल्यावर बुधवारी सायंकाळी अचानक बागूल यांची हकालपट्टी झाल्याचे वृत्त धडकले. परंतु, त्यास कोणी अधिकृतपणे दुजोरा दिला नाही. दरम्यानच्या काळात बागूल समर्थक कॅनडा कॉर्नरवरील त्यांच्या कार्यालय परिसरात जमा होऊ लागले. रात्री आठपर्यंत ही संख्या ५०० ते ६०० च्या वर जाऊन पोहोचली. यामुळे परिसरातील दुकानेही तातडीने बंद झाली. गर्दी वाढत असल्याने पोलिसांनी शिवसैनिकांना हटविण्यास सुरूवात केली. नंतर हे समर्थक रामवाडी येथील बागूल यांच्या निवासस्थानी धडकले. या ठिकाणी संबंधितांनी खा. संजय राऊत व बडगुजर यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. शिवसैनिकांमधील असंतोष लक्षात घेऊन पोलिसांनी बडगुजर यांच्या कार्यालयात बंदोबस्त तैनात केला.
माजी महानगरप्रमुख अर्जुन टिळे, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांच्यासह काही जुने पदाधिकारी बागूल यांच्या निवासस्थानी जमले. या निर्णयाबाबत सर्वामध्ये गोंधळाचे वातावरण होते. बागूल यांनी कार्याध्यक्षांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो संपर्क होऊ शकला नाही. या निर्णयाबद्दल जुन्या गटातील पदाधिकारी गुरूवारी एकत्र बसून पुढील भूमिका निश्चित करतील, असे टिळे यांनी सांगितले.
शिवसेना नेते सुनील बागूल यांची हकालपट्टी
शिवसेनेत उफाळून आलेल्या जुन्या व नवीन पदाधिकाऱ्यांच्या वादाची परिणती माजी जिल्हाप्रमुख सुनील बागूल यांच्या हकालपट्टीत झाल्याचे वृत्त बुधवारी सायंकाळी येऊन धडकल्यानंतर शेकडो बागूल समर्थकांनी एकत्र होत उपरोक्त निर्णयाचा निषेध करतानाच खा. संजय राऊत यांच्यासह पालिकेतील विरोधी पक्षनेते व गटनेते, विद्यमान जिल्हाप्रमुख यांच्याविरोधात तोफ डागली. प्रचंड घोषणाबाजी करत समर्थकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 10-01-2013 at 04:33 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leader sunil bagul drop out by shivsena