धार्मिक गडांच्या नारळी सप्ताहातून परस्परांवर ‘शरसंधान’
भाजप नेत्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी समाजावरील पकड घट्ट ठेवण्यासाठी, तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आपल्यालाही समाजाचे बळ मिळावे, या साठी धार्मिक गडांच्या नारळी सप्ताहातून एकमेकांवर शरसंधान करण्याची संधी साधली. दोघांच्या हजेरीने व आरोप-प्रत्यारोपांमुळे धार्मिक सप्ताह राजकीय कुरघोडय़ांचा आखाडा झाला!
दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर कट्टर राजकीय विरोधक बनलेल्या मुंडे बहीण-भावाला एकाच वेळी राज्यस्तरावर संधी मिळाली. समाजावरील आपली पकड मजबूत करण्यासाठी पंकजा मुंडे यांनी परळीत गोपीनाथगडाची निर्मिती केली. मात्र, त्याच वेळी महंत नामदेवशास्त्री यांनी भगवानगडावरून पंकजा मुंडे यांना राजकीय भाषण बंदीची घोषणा केल्याने समाजाच्या पातळीवर मोठे वादंग उठले. महंत नामदेवशास्त्री यांनी मात्र कोठरबन (तालुका वडवणी) येथील नारळी सप्ताहाचे व्यासपीठही राजकारण्यांपासून दूरच ठेवले. भाजपला मानणाऱ्या गावातील भगवानगडाच्या नारळी सप्ताहात गावकऱ्यांनी मात्र पंकजा मुंडे यांच्याप्रमाणेच या वेळी पहिल्यांदाच धनंजय मुंडे यांनाही निमंत्रित करून स्वागत केले. या पाश्र्वभूमीवर मंत्री मुंडे यांनी ‘समाजाचे मजबूत संघटन हीच आपली ताकद आहे, गोपीनाथ मुंडेंनी समाजाला एका छत्राखाली आणून ताठ मानेने जगण्याची शिकवण दिली. त्यामुळे माझ्या नेतृत्वबीजाचा वटवृक्ष होईपर्यंत सांभाळा’ अशी भावनिक साद घातली, तर धनंजय यांनी आपला संघर्ष सामान्य माणसासाठी असल्याने समाजानेही भावनिक राजकारणास भीक घालू नये, असा टोला लगावला. दुसरीकडे गहिनीनाथगडाच्या फुंदेटाकळी (तालुका पाथर्डी) येथील नारळी सप्ताहालाही दोघांनीही लागोपाठ हजेरी लावली. महंत विठ्ठल महाराज यांनी भगवानगडावर पंकजा मुंडे यांना केलेल्या भाषण बंदीच्या पाश्र्वभूमीवर, काहीजण ‘धर्म व राजसत्ते’ची सांगड तोडण्याचे काम करीत असल्याचा उल्लेख करून महंत नामदेवशास्त्रींवर निशाना साधून अंतर्गत वादावर नेमके बोट ठेवले. याचाच संदर्भ देत मंत्री पंकजा मुंडे यांनी आपली अवस्था महाभारतातील अभिमन्यूसारखी झाली आहे, तर ‘ते’ दुर्योधन असल्याचे सांगत धनंजय मुंडेंना लक्ष्य केले.
दुसऱ्या दिवशी याच सप्ताहात धनंजय मुंडे यांनी हजेरी लावून पंकजा मुंडे यांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. धार्मिक व्यासपीठावरून काय बोलावे काय बोलू नये, याची शिकवण मला आई-वडिलांनी दिली असल्याने काल येथे माझ्यावर झालेल्या आरोपांना योग्य ठिकाणी उत्तर देईल, असे सांगत ‘गडांशी माझे मुलाचे नाते नाही तर खऱ्या भक्ताचे आहे. पुरातन काळापासून संत-महंत, देवांनीही स्वतच्या मुलापेक्षा खऱ्या भक्तांवर जास्त प्रेम केल्याचे दाखले आहे. मला या ठिकाणी कोणाचे घोटाळे उघड करायचे नसून, त्यासाठी महाराष्ट्र पडला असल्याचा प्रतिटोला त्यांनी लगावला.

Story img Loader