नक्षलवादी चळवळीत वरिष्ठ नेत्यांमधील नेतृत्वाच्या मुद्यावरील मतभेदांनी आता गंभीर वळण घेतले असून, जहाल नक्षलवादी गुडसा उसेंडीची शरणागती ही त्याचीच परिणीती असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, आंध्र पोलिसांनी उसेंडीचा जबाब नोंदवण्याचे काम बुधवारी सुरू केले असून, यातून या मतभेदांवर बराच प्रकाश पडण्याची शक्यता आहे.
छत्तीसगडमधील दंडकारण्य स्पेशल झोन समितीचा प्रवक्ता व जहाल नक्षलवादी गुडसा उसेंडीने गेल्या आठवडय़ात आंध्र प्रदेश पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. नक्षलवादी चळवळीचा प्रमुख गणपतीच्या सोबतीने १९८० मध्ये या चळवळीत सक्रिय झालेल्या उसेंडीच्या शरणागतीने नक्षलवाद्यांच्या अंतस्थ वर्तुळात सारे ठीक नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
१९८० पासून वेगवेगळे गट स्थापून सशस्त्र संघर्ष करणाऱ्या नक्षलवाद्यांनी सप्टेंबर २००४ मध्ये विलीनीकरण घडवून आणले व भाकप माओवादी हा पक्ष स्थापन केला. तेव्हापासून या पक्षाचा प्रमुख गणपती आहे. सध्या ६८ वर्षांच्या असलेल्या या गणपतीच्या जागी आता कुणाला आणायचे यावरून पक्षाच्या वरिष्ठ वर्तुळात सध्या जोरदार वादंग सुरू असल्याची माहिती यंत्रणांनी गोळा केली आहे. विलीनीकरणाच्या आधी देशात पिपल्स वॉर ग्रुप व माओइस्ट कम्युनिस्ट सेंटर हे दोन मोठे गट अस्तित्वात होते. पक्षाची स्थापना झाल्यावर त्याची सूत्रे पीपल्स वॉरच्या गणपतीकडे देण्यात आली. आता गणपतीला निवृत्त करायचे असेल तर पूर्वाश्रमीच्या कम्युनिस्ट सेंटरच्या नेत्याकडे पक्षाची सूत्रे सोपवा, असा आग्रह केंद्रीय समितीतील अनेक वरिष्ठ नेत्यांनी सध्या धरला आहे.
पूर्वाश्रमीचे पीपल्स वॉर ग्रुपचे सदस्य यासाठी तयार नाहीत. पीपल्स वॉर मध्ये प्रामुख्याने आंध्रमधील नक्षलवाद्यांचा भरणा आहे. आंध्रतील हे नक्षलवादी इतरांकडे नेतृत्व जाऊ नये यासाठी प्रयत्न करीत आहेत. यावरून सध्या नक्षलवाद्यांच्या वर्तुळात तीव्र मतभेद निर्माण झाल्याचे गुप्तचर यंत्रणांचे म्हणणे आहे. या मुद्यावर पीपल्स वॉरच्या बाजूने आग्रही भूमिका घेणाऱ्या गुडसा उसेंडीचा भ्रमनिरास झाला व त्यातून त्याने शरणागतीचा मार्ग स्विकारला असे या यंत्रणांचे म्हणणे आहे. स्वत: उसेंडी याने सुद्धा पोलिसांना दिलेल्या प्राथमिक माहितीत वैचारिक पातळीवर वैफल्यग्रस्त झाल्यामुळे आत्मसमर्पण केले, असे म्हटले आहे.
नक्षलवाद्यांनी मात्र अंतर्गत मतभेदांना जाहीर स्वरूप येऊ नये यासाठी गुडसा उसेंडीने पैसा व बाईच्या मोहापायी चळवळ सोडली असा दावा केला आहे.
छत्तीसगडमध्ये सक्रिय असलेल्या जोगन्नाच्या नावाने तसे पत्रक जारी करण्यात आले आहे. गुप्तचर यंत्रणांना या दाव्यात तथ्य वाटत नाही. वयाच्या ५३ व्या वर्षी बाईच्या मोहात कुणी चळवळ सोडणे शक्य नाही असे या यंत्रणांचे म्हणणे आहे.
नक्षलवादी चळवळीत नेतृत्वावरून मतभेद
नक्षलवादी चळवळीत वरिष्ठ नेत्यांमधील नेतृत्वाच्या मुद्यावरील मतभेदांनी आता गंभीर वळण घेतले असून, जहाल नक्षलवादी गुडसा उसेंडीची शरणागती ही त्याचीच परिणीती असल्याची माहिती समोर आली आहे.
First published on: 16-01-2014 at 02:45 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leadership issue create differences in naxal movement