रवींद्र जुनारकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोळसा, सिमेंट, वीज, स्टील व पेपर, कोळसा खाणी आदी आघाडीच्या उद्योगांमुळे औद्योगिक जिल्हा अशी ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात प्रदूषणामुळे नागरिकांचा श्वास कोंडला आहे. त्याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे.

उद्योगनगरी असल्याने व रोजगार संधी उपलब्ध असल्याने जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्नात ३ टक्क्यांपर्यंतची वाढ झाली आहे. खनिज संपत्तीचे वरदान लाभलेल्या या जिल्ह्यात कोळशाचे अंदाजित साठे १६०६ मिलियन टन इतके आहे. २९ कोळसा खाणी असून १७ भूगर्भावर तर १२ भूमिगत आहेत. आयर्न ओअर अर्थात लोखंडाचे मुबलक साठे असून त्याचे प्रमाण राज्याच्या लोह खनिज क्षमतेच्या ७७.९ टक्के आहे. याशिवाय बल्लारपूर पेपर मिल, अंबुजा, एसीसी, अल्ट्राटेक, माणिकगड (अल्ट्राटेक). दालमिया असे पाच सिमेंट कारखाने, वीज निर्मिती प्रकल्प, सेलचा स्टील प्लान्ट, चांदा आयुध निर्माणी, लोह पोलाद प्रकल्प, भाताची राईस मिल यासाठी हा जिल्हा प्रसिद्ध आहे.

औद्योगिक भरभराट होत असताना जिल्ह्याच्या पर्यावरणाची होणारी हानी मात्र चिंतेचा विषय आहे. विपुल वनसंपदा असूनही जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात प्रदूषण होत असून त्याचा आरोग्यावरही परिणाम जाणवत आहे. शासनाकडून प्रदूषणमुक्तीसाठी प्रयत्न केले जात असले तरी अजून बराच पल्ला गाठावा लागणार आहे. मानव विकास निर्देशांकात राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये चंद्रपूर जिल्हा २० व्या स्थानावर आहे. वळण मार्ग (बायपास) नसलेले चंद्रपूर हे विदर्भातील एकमेव शहर आहे. अंतर्गत रस्त्यांचे जाळे आता कुठे विणण्यास सुरुवात झाली असून अजूनही नदी, नाल्यांवर मोठे पूल नसल्याने पावसाळय़ात पुरामुळे जिल्ह्यांतर्गत रस्ते वाहतुकीसाठी बंद असतात. जिल्हा शिक्षणाच्या क्षेत्रात माघारलेला आहे. उच्च दर्जाच्या नामांकित शिक्षण संस्था या जिल्ह्यात नाही. त्याचा परिणाम दहावी व बारावीनंतर या जिल्ह्यातील बहुसंख्य विद्यार्थी शिक्षणासाठी इतर शहरात स्थलांतरित होत आहेत. 

 आरोग्य सुविधांची कमतरता

आरोग्याच्या सुविधांसाठी जिल्हा नागपूरवर अवलंबून आहे. साधा अपघात झाला तरी गंभीर रुग्णाला नागपूरला पाठवले जाते. जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा सामान्य रुग्णालय आहे. कॅन्सर हॉस्पिटल पूर्णत्वाच्या दिशेने जात आहे. स्वतंत्र महिला रुग्णालय प्रस्तावित आहे. मात्र उद्योगनगरीची गरज लक्षात घेता  आहे त्यापेक्षा आरोग्याच्या सुविधांमध्ये वाढ करणे गरजेचे आहे.

सिंचन व प्रमुख पिके

जिल्ह्यातील ७९ टक्के लोकांची उपजीविका आजही शेतीवरच आहे. जिल्ह्यातील पिकाखालील ओलिताचे क्षेत्र १ लाख ४५ हजार ९९८ हेक्टर आहे. जिल्ह्याच्या पूर्वेकडील भागात म्हणजेच ब्रम्हपुरी, नागभीड, सिंदेवाही व मूल या चार तालुक्यांमध्ये धानाची शेती केली जाते. त्यासोबतच कापूस, सोयाबीन, ज्वारी, तूर, मिरची ही प्रमुख पिके घेतली जातात.

रोजगार संधी

१९६० च्या सुमारास औद्योगिक वसाहत येथे अस्तित्वात आली. नोंदणीकृत कारखान्यांची संख्या १८२ असून १८० कारखाने सुरू आहेत. २७ हजार ७१३ कामगारांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत ६८८ प्रकल्प असून ५ हजार ८९० कामगारांना रोजगार दिला आहे. उद्योग केंद्राद्वारे २०२१-२२ सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम ८ हजार ३०५ असून रोजगार संख्या ६७ हजार १४४ आहे. पडोली वसाहतीत ३२९ उद्योगधंदे स्थापन झाले.  उद्योगांमुळे कामगारांची संख्या या जिल्ह्यात मोठी आहे.

व्याघ्र प्रकल्प जागतिक आकर्षण केंद्र

जिल्ह्यातील  ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला दरवर्षी देशविदेशातील बहुसंख्य पर्यटक भेट देतात. त्यामुळे संबंधित उद्योगाला चालना मिळाली असून त्यातून रोजगार निर्मितीही झाली आहे. वर्षभरात ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला २ लाख ८२ हजार पर्यटकांची भेट दिली. करोना संपल्यानंतर पर्यटकांचा ओढा वाढला आहे. १ एप्रिल २०२२ ते २८ फेब्रुवारी २०२३ पर्यंत २ लाख ८२ हजार ६१२ पर्यटकांनी ताडोबाला भेट दिली. यात ५ हजार १३ विदेशी पर्यटकांचा समावेश आहे. लाखोंच्या संख्येने पर्यटक येथे येत असल्याने २८६ कोटी रुपयांची मंजूर झालेली टायगर सफारीची कामे लवकर सुरू करणार असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे. अहमदनगरच्या धर्तीवर प्राण्यांचे ३ डी रिसर्च सेंटर तयार करणार आहे. ताडोबात ९१ वाघ आहेत. तर शंभर पेक्षा अधिक बिबटे आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leading industries industrial district pollution in chandrapur district citizens trouble ysh
Show comments