अलिबाग – मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याला गळती लागली आहे. बोगद्याला लागलेली गळती थांबवण्यासाठी तातडीने काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी आता आयआयटीच्या तंत्रज्ञांची मदत घेतली जाणार आहे.

मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटाला पर्याय म्हणून कशेडी बोगद्यांची निर्मिती केली आहे. यामुळे पोलादपूर ते खेड हे अंतर अवघ्या २० मिनिटांत पूर्ण करणे शक्य झाले आहे. यामुळे तळ कोकणात जाणाऱ्या आणि मुंबईकडे येणाऱ्या पर्यटकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र पावसाळा सुरू झाल्यापासून कशेडी बोगद्याला गळती लागल्याचे दिसून येत आहे. बोगद्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाण्‍याचे फवारे सुरू आहेत. त्यामुळे प्रवाशी आणि वाहनचालक धास्तावले आहेत. कारण पावसाचे प्रमाण वाढले की फवारे आणखी मोठे होत आहेत. ही गळती कशी थांबवायची असा प्रश्‍न महामार्ग विभागाला पडला आहे. पावसाचे गळणारे पाणी थेट खाली वाहनांवर पडू नये म्‍हणून पन्‍हळ लावून पाणी बोगद्याबाहेर काढले जात असून ही तात्‍पुरती व्यवस्था केली असली तरी यावर ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.

हेही वाचा – पायाभूत सुविधा प्रकल्पांना मोठा निधी; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी आशियाई विकास बँकेकडून कर्ज घेण्यास सरकारची मान्यता

हीबाब लक्षात घेऊन आज राष्‍ट्रीय महामार्ग विभागाच्‍या वरिष्‍ठ अधिकाऱ्यांनी बोगद्याची पहाणी केली. यावेळी त्‍यांच्‍या समवेत आयआयटीच्‍या तत्रज्ञांचे पथकदेखील होते. त्‍यांनी संपूर्ण बोगद्याचे सर्वेक्षण केले. या माध्‍यमातून पाहणी करून गळतीच्‍या कारणांचा शोध घेतला जात आहे. सध्‍या ग्राउटींग करून गळती थांबवण्‍याचा प्रयत्‍न सुरू आहे. तत्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू आहे. दरम्यान, नव्‍याने खोदकाम केले जाते. तेव्‍हा पावसाळ्यात पाण्‍याचे पूर्वीचे प्रवाह सुरू असतात, त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. लवकरच गळती थांबवण्‍यात यश येईल, असा विश्वास राष्‍ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

कशेडी बोगद्यातील गळती थांबवण्‍यासाठी सर्व प्रयत्‍न केले जात आहेत. आयआयटी तत्रज्ञांना पाचारण करण्‍यात आले आहे. कारणे शोधून गळतीवर उपाययोजना करण्‍यात येईल आणि गळतीवर नियंत्रण मिळवले जाईल. – संतोष शेलार, मुख्‍य अभियंता

हेही वाचा – विधान परिषदेसाठी ७१.८७ टक्के मतदान; भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीची कसोटी

राष्‍ट्रीय महामार्ग विभाग

मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी येथील कोकणात जाणाऱ्या लेनवरील बोगदा ऑगस्‍टअखेर वाहतुकीसाठी खुला होणार आहे. कोकणातून मुंबईकडे जाणारा बोगदा सध्‍या दुहेरी वाहतुकीसाठी वापरला जात आहे.