“विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा नितीन गडकरींकडून प्रयोग करणे शिकावे. त्यांनी जीवनात विविध यशस्वी प्रयोग केले आहेत.”, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज (गुरुवार) अकोला येथे केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ३६ व्या दीक्षांत समारंभात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
राज्यपाल म्हणाले, “जीवनाचे ध्येय काय हे विद्यार्थ्यांनी प्रथम निश्चित करावे. सर्वप्रथम एक आदर्श नागरिक बनणे गरजेचे आहे. कृषी क्षेत्रात विविध प्रयोग करावे लागतात. त्यासाठी नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरी यांचा आदर्श घ्यावा. मी स्वतः देखील राजभवनाच्या परिसरामध्ये विविध प्रयोग करीत असतो.” तसेच, गडकरी यांनी सांगितल्याप्रमाणे राजभवनामध्ये ग्रीन हायड्रोजन तयार करणार असल्याचेही राज्यपालांनी यावेळी सांगितले.
आगामी काळात महाराष्ट्रात समृद्धी येईल –
“महाराष्ट्र हा समृद्ध प्रदेश असून येथे विविध प्रकारचे चांगले कृषी उत्पादन होतात. महाराष्ट्रात सर्व काही असताना येथील शेतकरी आत्महत्या का करतात?, हा खरा चिंतनीय प्रश्न आहे. दुष्काळाची समस्या येथे भेडसावते. जलयुक्त शिवार सारख्या योजनेतून सिंचनाचे मोठे कार्य झाले. चांगल्या कार्यासाठी प्रबळ इच्छाशक्तीची गरज असून, आगामी काळात महाराष्ट्रात समृद्धी येईल.”, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.