राज्यातील विविध कारागृहांमध्ये शिक्षा भोगत असताना संचित (पॅरोल) आणि अभिवचन (फलरे) रजेवर सोडण्यात आलेले सुमारे ५७८ कैदी कारागृहांमध्ये परत न जाता पळून गेल्याचे समोर आले आहे. या फरार कैद्यांची माहिती कारागृह विभागाने जाहीर केली आहे.

विविध गुन्ह्यांमध्ये शिक्षा झालेल्या कैद्यांना पॅरोल आणि फलरे, अशा दोन प्रकारच्या रजेवर बाहेर सोडले जाते. यातील फलरे रजा ही प्रत्येक कैद्याचा अधिकार असतो. शिक्षेचा विशिष्ट कालावधी पूर्ण केल्यावर त्याची वर्तणूक आणि स्थानिक पोलिसांचा अहवाल मागवून त्यांना ही रजा दिली जाते. कारागृह महानिरीक्षक १४ दिवसांची संचित रजा देऊ शकतात. त्यात पुन्हा १४ दिवसांची वाढ करण्याचा अधिकार त्यांना आहे. पॅरोल ही कैद्याचे नातेवाईक आजारी असतील किंवा घरी कार्यक्रम असेल, तर ती विभागीय आयुक्तांकडून दिली जाते. कैद्याच्या कुटुंबातील व्यक्ती आजारी आहे किंवा त्याच्या घरी एखादा महत्वाचा कार्यक्रम आहे, अशा वेळी कैदी पॅरोलसाठी अर्ज करू शकतो. त्यासाठी त्याच्यावर गुन्हा दाखल असलेल्या पोलीस ठाण्याचा अहवाल, कारागृहातील त्याचा वर्तणूक अहवाल, त्याचा नातेवाईक आजारी असेल, तर त्याचा अहवाल हा संबंधित विभागीय आयुक्तांकडे पाठवला जातो. ते पाहून विभागीय आयुक्त कार्यालयाकडून त्याला ७ ते ३० दिवसांपर्यंत संचित रजा मंजूर केली जाते. यात वाढ करायची असेल, तर पुन्हा ही प्रक्रिया पार पाडावी लागते.

अमरावती मध्यवर्ती कारागृहातून संचित आणि अभिवचन रजा घेऊन पुन्हा न परतलेल्या १४८ कैद्यांना फरार घोषित करण्यात आले आहे. यात हत्या प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची संख्या सर्वाधिक आहे. १९९६ ते २०१६ या कालावधीत हे कैदी रजेवर गेले, ते पुन्हा परतलेच नाहीत. अमरावती मध्यवर्ती कारागृहात सध्या १ हजार ७१ कैदी आहेत. त्यापैकी ५७७ कैदी विविध गुन्ह्यांमध्ये शिक्षा भोगत आहेत. त्यात ३५ महिलांचाही समावेश आहे. ज्यांचे गुन्हे अद्याप सिद्ध झालेले नाहीत, असे ४७१ कैदी येथे आहेत. कैद्यांपैकी १४८ कैदी अभिवचन व संचित रजेवरून परतलेलेच नाहीत. यात ९० कैदी संचित रजेवर, तर ५९ कैदी अभिवचन रजेवर बाहेर पडले आहेत, अशी माहिती कारागृह सूत्रांनी दिली.

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातून १४० कैदी फरार घोषित करण्यात आले आहेत. त्यात परप्रांतातील २३ कैद्यांचाही समावेश आहे. मुंबईतील सर्वाधिक १६ आणि बीड जिल्ह्यातील १४ कैदी रजेवर गेले ते परतलेच नाहीत. येरवडा मध्यवर्ती कारागृहातून १२३ कैदी रजेवर गेले होते. ते न परतल्याने त्यांना फरार घोषित करण्यात आले आहे. यात संचित रजेवर गेलेल्या ५२ आणि अभिवचन रजेवर गेलेल्या ७१ कैद्यांचा समावेश आहे. औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहातून ५७, नागपूर मध्यवर्ती कारागृहातून २५, कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहातून ५२, येरवडा खुल्या कारागृहातून ३, मुंबई मध्यवर्ती कारागृहातून ३, ठाणे मध्यवर्ती आणि रत्नागिरी विशेष कारागृहातून प्रत्येकी २, पैठण खुल्या कारागृहातून १७, तर मोर्शी खुल्या कारागृहातून एका कैद्याला फरार घोषित करण्यात आले आहे. या कैद्यांना हुडकून काढण्याचे आव्हान आता पोलीस यंत्रणेसमोर आहे.

Story img Loader