वाई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जगात विकासपुरुष म्हणून ओळख कायम ठेवण्यासाठी उदयनराजे भोसले निवडून येणे गरजेचे आहे. साताराच्या विकासाचं माझ्यावर सोडा, तुम्ही फक्त उदयनराजेंना निवडून द्या, बाकीचा काही विचार करू नका. मी राज्य मंत्रिमंडळातून भरपूर निधी देईन. काहीही झाले तरी उदयनराजेंना मोठं मताधिक्य मिळायला हवं असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाई येथे केले.
महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी आयोजित प्रचार सभेत अजित पवार बोलत होते. यावेळी उदयनराजे भोसले आमदार मकरंद पाटील, देवयानी फरांदे धैर्यशील कदम, नितीन पाटील, सुनील काटकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आरपीआयचे अशोक गायकवाड, संजय गायकवाड, नितीन भरगुडे पाटील यांची भाषणे झाली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून सर्व निवडणुकीमध्ये तुम्ही घड्याळाचा खासदार निवडून दिला. यावेळेस तुमच्या कार्यकर्त्यांच्या माझ्या पक्षाच्या सहकाऱ्यांच्या मनामध्ये ही गोष्ट येणं काही चुकीचे नाही. मात्र विकासासाठी सत्तेबरोबर राहणे गरजेचे असते असे यशवंतराव चव्हाण यांनी सांगितले आहे . त्यांच्या शिकवणीप्रमाणे आम्ही महायुतीमध्ये सामील झालो आहोत. सर्व पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. मी आपणास शब्द देतो, जून महिन्यात मी नितीन पाटील यांना खासदार म्हणून दिल्लीला पाठविल्याशिवाय राहणार नाही, असा शब्द अजित पवार यांनी बैठकीत दिला.
राज्य सरकारचे सहा लाख कोटींचं बजेट माझ्या हातात आहे. महायुतीच्या माध्यमातून साताऱ्यासाठी अधिक विकास कामे उदयनराजेंच्या माध्यमातून करण्याचे काम आम्ही यापुढील काळात करू. साताराचे वैद्यकीय महाविद्यालय, पाणी योजना, शहरी विकास, गड किल्ले दुरुस्ती आणि पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. जगामध्ये सर्वाधिक लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. राज्यामध्ये आपण मोठ्या संख्येने निधी वितरित करत असतो. मात्र यामध्ये केंद्राचा सहभाग मिळवण्यासाठी व गतिमान विकासासाठी स्थिर सरकार असणे गरजेचे आहे आणि स्थिर सरकार फक्त नरेंद्र मोदी देऊ शकतात. त्यांच्या पाठिंब्याकरता एकेक खासदार दिल्लीला गेला पाहिजे. साताऱ्यातून महायुतीने उदयनराजेंना दिल्लीला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीतील घटक पक्षांमध्ये कोणाचेही कोणतेही गैरसमज नाहीत. सर्वजण मिळून आम्ही प्रचाराचे काम करत आहोत. उदयनराजे हे महायुतीचे प्रमुख उमेदवार आहेत. कोणीही कोणताही दुसरा विचार न करता फक्त त्यांच्या पाठीशी राहावे. वाई-महाबळेश्वर-खंडाळा मतदारसंघाला मोठ्या प्रमाणात निधी देण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि मी केले आहे, असेही अजित पवार म्हणाले.
हेही वाचा – सांगली: मिरजेजवळ शेतात लष्कराच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग
यावेळी बोलताना उदयनराजे भोसले यांनी केंद्रात स्थिर सरकार असल्याशिवाय विकास होत नाही, देशात नरेंद्र मोदी हे स्थिर सरकार देऊ शकतात. आपण सर्वांनी त्यांच्या नेतृत्वाबरोबर रहावे, असे आव्हान त्यांनी केले. यावेळी मकरंद पाटील यांनी महायुतीतून आपल्या मतदारसंघाला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे, किसन वीर व खंडाळा कारखान्यालाही मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केला आहे. आपण सर्वांनी महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन केले.