राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह पक्षाच्या नेत्यांवर आरोप करीत माजी प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आ. बबनराव पाचपुते यांनी त्यांच्या समर्थकांसह अखेर पक्षाला सोडचिठ्ठी दिली. मात्र कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेशाचा आग्रह असला तरी स्वत: पाचपुते यांनी मात्र कोणत्या पक्षात प्रवेश करणार हे गुलदस्त्यातच ठेवले.
आगामी विधानसभा निवडणूक आपण लढवणार असल्याचे सांगताना त्यांनी निवडणूक अपक्ष की कोणत्या पक्षाकडून लढवणार याचा निर्णय कार्यकर्त्यांंशी चर्चा करुन घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्य़ात पालकमंत्री मधुकर पिचड विरुद्ध पाचपुते या वादात धनगर आरक्षणाच्या मुद्यावरुन ठिणगी पडली आहे, त्याबद्दल पाचपुते काय बोलतात याबद्दल उत्सुकता होती, मात्र या वादाचा त्यांनी थेट उल्लेख केला नाही.
काल, स्वातंत्र्यदिनी श्रीगोंद्यातील तुळशीदास मंगल कार्यालयात पाचपुते यांनी समर्थकांचा मेळावा घेत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. मेळाव्यात पाचपुते कोणती भूमिका घेतात याकडे राज्याचे लक्ष लागले होते. पक्षाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग अंभग यांची शिष्टाई कामाला आली नाही व शरद पवारांमध्ये पांडुरंग पाहणारा हा आधुनिक वारकरी अखेर पांडुरंगच पावत नाही असे म्हणत पक्ष सोडण्याचा निर्णय जाहीर करून मोकळा झाला. यावेळी तालुक्यातील सर्वच पदधिकाऱ्यांनी पक्षातील पदाचे राजीनामे देण्याचे जाहीर केले. दुपारी १ वाजता सुरू झालेला मेळावा पाच तास चालला. यावेळी वक्त्यांनी आपल्या भाषणामध्ये राष्ट्रवादीवर सडकून टीका करीत पाचपुते यांना भाजपमध्ये प्रवेशाचा आग्रह केला.  स्वत: पाचपुते यांनी शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांच्यावर थेट टीका करीत स्वाभिमानाचा राग आळवला.
पाचपुते यांच्या समर्थकांकडे तालुक्यातील पंचायत समिती, नगरपालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अशी सत्तास्थानेही आहेत. पाचुपते यांच्याबरोबर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देताना हे समर्थक या सत्तापदांचाही राजीनामा देणार का हे मात्र यावेळी जाहीर करण्यात आले नाही.

Story img Loader