पेणमध्ये गणेश मूर्ती रंगवण्याचे काम अंतिम टप्प्यात

गणेशोत्सव आता अवघ्या १८ दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे गणपती मूर्तिकारांचे गाव म्हणून नावारूपास आलेल्या पेणमध्ये गणेश मूर्ती रंगवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. देशभरातील विविध भागात गणेश मूर्ती पाठविण्याचे काम सध्या सुरू आहे. या वर्षी बाजीराव पेशवा आणि एलईडी लाईटवाल्या गणपतींना विशेष मागणी होताना दिसत आहे.

पेण शहराला गणेश मूर्तीकलेचा १५० वर्षांचा इतिहास लाभला आहे. कै. वामनराव देवधर यांनी सुरू केलेला गणेश मूर्ती बनविण्याचा व्यवसाय आता पेण शहर आणि आसपासच्या परिसरात मोठय़ा प्रमाणात फोफावला आहे. आज पेण शहरात गणेश मूर्ती बनवणारे १५० मूर्तिकार कार्यरत आहेत, तर जोहे, हमरापूर, वडखळ आणि कामाल्रे परिसरात गणेश मूर्ती बनवणाऱ्या ३०० हून अधिक कार्यशाळा आहेत. यातून दरवर्षी जवळपास २५ लाख गणेश मूर्त्यां तयार केल्या जातात. ज्या देशविदेशातही पाठवल्या जातात. ह्य़ा मूर्तिकला व्यवसायातून दरवर्षी २५ ते ३० कोटींची उलाढाल होत असते.

या वर्षीदेखील पेणमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिस आणि शाडूच्या मातीच्या गणेश मूर्ती मोठय़ा प्रमाणात तयार करण्यात आल्या आहेत. यात बाजीराव पेशवा, आणि एलईडी लाईटवाल्या गणेश मूर्ती लक्षवेधी ठरल्या आहेत. गेल्या वर्षी ‘बाजीराव मस्तानी’ हा चित्रपट प्रदíशत झाला होता. ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला होता. ही बाब लक्षात घेऊन पेशवाई पगडी घातलेला आणि सिंहासनावर बसलेला बाजीरावांच्या रूपातील गणपती ग्राहकांच्या पसंतीला उतरला आहे. बाजीरावाच्या रूपातील सात प्रकारच्या गणेश मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. त्यांना प्रचंड मागणी आहे. त्यामुळे गेल्या वर्षी ‘जय मल्हार’ रूपातील गणपतींना असणारी मागणी घटली असल्याचे मूर्तिकार वडके यांनी सांगीतले.

या शिवाय पेण येथील दीपक समेळ यांनी एलईडी लाईटवाले गणपती हे सर्वत्र चच्रेचा विषय ठरले आहेत. मूर्तीला आकर्षक आणि रंगीबेरंगी एलईडी दिव्यांची सजावट करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पाच प्रकारच्या एलईडी लाईटवाल्या गणेश मूर्त्यां आणि गौरी बाजारात विक्रीसाठी त्यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्या मूर्ती अडीच ते तीन हजारांना विकल्या जात आहेत. या शिवाय बाल गणेश रूपातील गणपती, सिद्धिविनायक रूपातील गणपती आणि मोती आणि अमेरिकन डायमंड यांनी सजावट केलेल्या मूर्तीना सध्या जास्त मागणी असल्याचे समेळ यांनी सांगितले आहे. आकर्षक रंगसंगती आणि सुबक मूर्ती ही पेणच्या गणेश मूर्तीची वैशिष्टय़ असून या वर्षी जवळपास २५० प्रकारच्या गणेश मूर्ती विक्रीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.

 

 

Story img Loader