माकपचे ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांचा हल्ल्यात मृत्यू झाल्याचे संतप्त पडसाद शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्यादरम्यान उमटले. डावे पक्ष व समविचारी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत मुख्यमंत्र्यांनी परत जावे, अशी मागणी करून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनाचा फटका मुख्यमंत्र्यांच्या वाहन ताफ्याला बसू नये, यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना ताब्यात घेतले.
नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कामांचा आढावा, नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन आदी कार्यक्रमांसाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर पानसरे यांच्या निधनाचे सावट होते. डावे पक्ष व समविचारी संघटनांनी सकाळीच मोर्चा काढण्याचे नियोजन केले. त्र्यंबकेश्वर येथील आढावा बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शहरात पोलीस आयुक्तालय इमारतीचे उद्घाटन होणार होते. ही बाब लक्षात घेऊन माकप, आप, अंनिस व अन्य संघटनांच्या कार्यकर्त्यांनी हुतात्मा स्मारक येथून मोर्चा काढला. प्रमुख रस्त्यांवरून निषेधाच्या घोषणा देत मोर्चेकरी गंगापूर रस्त्यावरील पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर पोहोचले. पानसरे यांचा हल्ल्यात मृत्यू झाला. त्यांच्यावरील हल्ल्याला पाच दिवस उलटूनही हल्लेखोर आणि त्या मागील सूत्रधार यांचा छडा लागलेला नाही. नरेंद्र दाभोलकर आणि पानसरे यांच्यावरील हल्ल्यांमध्ये साम्य असून दोन्ही घटनांचा तपास करून हल्लेखोरांना त्वरित अटक करावी अशी मागणी त्यांनी केली. पानसरे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचा हल्ल्यात मृत्यू होऊनही मुख्यमंत्री नाशिकमध्ये कार्यक्रमात सहभागी होत असल्याचा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवून निषेध केला. मुख्यमंत्र्यांनी परत जावे, अशी घोषणाबाजी करण्यात आली. रास्ता रोकोचाही प्रयत्न झाला. मुख्यमंत्री या ठिकाणी येण्याची वेळ झाल्यामुळे पोलीस यंत्रणेने बळाचा वापर करत आंदोलकांना वाहनात डांबण्यास सुरुवात केली. यावेळी आंदोलक व पोलीस यांच्यात झटापट झाली. आंदोलकांना पंचवटी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. मुख्यमंत्री दिवसभर शहरात असल्यामुळे पुन्हा असा काही प्रकार घडू नये म्हणून त्यांना बराच काळ पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले.
पुणे : विविध संस्था, संघटनांची आदरांजली
शिवराय विचार पथारी संघटना, दलित पँथर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, शिव संग्राम व लहुजी महाराज संघ यांच्यातर्फे शनिवारी पानसरे यांच्या हत्येचा तीव्र निषेध करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने पानसरे यांना आदरांजली अर्पण केली. भारतीय कम्युनिस्ट पक्षाने २३ फेब्रुवारी रोजी पानसरे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आदरांजली सभेचे आयोजन केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा