रत्नागिरी : लांजा राजापूर मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी यांनी २०२४ चा पराभव जिव्हारी लागला असल्याचे सांगत माजी खासदार विनायक राऊत माझ्या पराभवाला कारणीभूत असल्याने आपण शिवसेना ठाकरे गटातून बाहेर पडल्याचे सांगितले आहे. एकनाथ शिंदेंसोबत झालेल्या बैठकीनंतर साळवींनी ठाकरे शिवसेना पक्ष का सोडला, कोणामुळे सोडला याचे कारण सांगितले आहे.

साळवी म्हणाले की, २०२४ चा पराभव माझ्या जिव्हारी लागला आहे. या निवडणुकीत माझ्या पक्षातीलच नेत्यांनी माझ्याविरुद्ध काम केले. विनायक राऊत हेच माझ्या पराभवाला कारणीभूत असून त्यांच्यामुळे मी पक्ष सोडत आहे, असे साळवी यांनी जाहीर केले. विनायक राऊत यांनी माझ्याविरोधात काम केल्याचा गंभीर आरोप राजन साळवी यांनी केला आहे.

यावेळी साळवी यांनी सामंत बंधू आणि साळवी वादावरही त्यांच्यात झालेला समझोता स्पष्ट केला. एकनाथ शिंदे यांनी आम्हाला तिघांनासुद्धा समजवून सांगितलं की, ही शिवसेना आपल्याला वाढवायची आहे. यामुळे आमच्यातील वाद मिटविण्यात आल्याचे साळवी यांनी सांगितले. माझ्या मतदारसंघातील माणसांना न्याय द्यायचा असेल तर आणि मतदारसंघाचा व जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर मला योग्य तो निर्णय घेतला पाहिजे असं मी बोललो होतो, त्यामुळे आता मी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला असल्याचे साळवी यांनी सांगितले.

कोणत्याही चौकशीला आम्ही घाबरत नाही, तेव्हाही मी घाबरलो नाही. आताही मी घाबरत नाही. चौकशी केली तरी मी सहकार्य करेन आणि मला खात्री आहे की, मी निर्दोषच असणार आहे, असेही साळवी यांनी ठणकावून सांगितले.

Story img Loader