महिला पोलिसांना मारहाण करणा-यांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, असे मत गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी रविवारी येथे व्यक्त केले. गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी महिला पोलिसांना झालेल्या मारहाणप्रकरणी शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह कार्यकर्त्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. पाटील यांच्या विधानातून आमदार क्षीरसागर यांना अटक होणार असल्याचे संकेत प्राप्त झाले असून पोलीस प्रशासनही या दिशेने हालचाली करत असल्याचे दिसत आहे.
    कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये रविवारी आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मतदार नोंदणीचा कार्यक्रम आयोजित केला होता. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, माजी आमदार पी. एन. पाटील अध्यक्षस्थानी होते. या वेळी गृहराज्यमंत्री पाटील म्हणाले, गेली तीन वष्रे गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक शांततेत निघाली आहे, मात्र याचवेळी बठा सत्याग्रह करण्याची गरज का होती, असा प्रश्न उपस्थित करून यासंदर्भात माजी आमदार मालोजीराजे यांनी भूमिका मांडणे गरजेचे होते, असे मत त्यांनी व्यक्त केले. कोल्हापूर व इचलकरंजी या दोन्ही ठिकाणी गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीवेळी दगडफेक, लाठीमार असा प्रकार घडला. याबाबत माध्यमांकडून विचारणा होत होती, पण त्यावर लगेचच प्रतिक्रिया व्यक्त केली असती तर ती उचित ठरली नसती. या प्रकाराला राजकीय रंग दिला जात आहे. गुन्हय़ांच्या बाबतीत प्रशासन करत असलेली कारवाई योग्य असल्याचा निर्वाळाही गृहराज्यमंत्र्यांनी या वेळी दिला.
    अधिकाधिक लोकांपर्यंत मतदार नोंदणीचा उपक्रम पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्नशील राहावे असे आवाहन करून पाटील म्हणाले, हे काम गतीने पूर्ण करण्यासाठी जिल्हय़ात बारा लॅपटॉप पुरवले जाणार आहेत. इलेक्ट्रॉनिक मतदारयादी अद्ययावत केले जात आहे. तरुणांपर्यंत या उपक्रमाची माहिती मिळण्यासाठी महाविद्यालयाबाहेर प्रसार होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा