अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळपास ४० आमदारांनी बंडखोरी केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या सत्तासंघर्षाला सुरुवात झाली आहे. अजित पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि ‘घड्याळ’ या पक्षचिन्हावर दावा ठोकला आहे. याबाबतचं पत्रही अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगाकडे सादर केलं आहे. अजित पवार हेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, अशा आशयाचं पत्रही निवडणूक आयोगाकडे दिलं आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन गट एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील असीम सरोदे यांनी अजित पवार गटाच्या भवितव्याबद्दल मोठं विधान केलं आहे. अजित पवारांचा गट बेकायदेशीर आणि असंविधानिक आहे, असं स्पष्ट विधान असीम सरोदे यांनी केलं आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

हेही वाचा- “अजित पवारांच्या बंडखोरीनंतर शरद पवार हसून एकच वाक्य बोलले, ते म्हणजे…”, रोहित पवारांचा खुलासा

राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीवर प्रतिक्रिया देताना असीम सरोदे म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदेंच्या गटाबाबत जो निकाल दिला होता, त्याचा अन्वयार्थ जर आपण व्यवस्थित समजून घेतला, तर अजित पवारांचा गट बेकायदेशीर आहे, हे स्पष्टपणे लक्षात येईल. कारण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातही स्पष्टता आहे. सर्वोच्च न्यायालयातील युक्तिवादादरम्यान बहुसंख्येचा मुद्दा चर्चिला होता. त्यामुळे प्रत्येक वेळी लोकशाहीत बहुसंख्या महत्त्वाची नसते.”

हेही वाचा-शरद पवारांना आणखी एक धक्का? अत्यंत विश्वासू माजी मंत्री अजित पवार गटाच्या वाटेवर

“जेव्हा मूळ पक्ष आणि विधीमंडळ पक्ष असा जेव्हा पेच निर्माण होतो. तेव्हा केवळ आमदारांची बहुसंख्या महत्त्वाची नसते, तर त्या बहुसंख्येला काय नाव आहे? आणि त्याची कायदेशीर ओळख (Legal Identity) काय आहे? हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं. या प्रकरणात अजित पवारांच्या गटाला कोणत्याही प्रकारचं कायदेशीर नाव नाही. कायदेशीर चौकटीत त्या गटाला कोणतंही नाव देता येत नाही. त्यामुळे अजित पवारांचा गट बेकायदेशीर आहे. असंविधानिक आहे, असं आपल्याला स्पष्टपणे सांगायला पाहिजे”, असं असीम सरोदे यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Legal expert lawyer asim sarode reaction ajit pawar faction is illegal sharad pawar ncp dispute rmm
Show comments