अजित पवारांसह काही आमदारांनी बंडखोरी केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षचिन्ह कुणाचं? यावरून नवीन पेच निर्माण झाला आहे. हे प्रकरण आता निवडणूक आयोगासमोर गेलं आहे. ६ ऑक्टोबर रोजी यावर सुनावणी पार पडली. यावेळी अजित पवार गटाने बहुसंख्य आमदार आमच्याच बाजुला आहेत, असा दावा केला. तसेच शिवसेनेच्या बाबतीत जो निकाल दिला, तोच निकाल आम्हाला द्या, अशी मागणीही अजित गटाने केली.
या मागणीवर कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी प्रतिक्रिया दिली. शिवसेनेच्या बाबतीत जो निकाल दिला, तोच निकाल आमच्या बाबतीत द्या, अशी मागणी करणं, हे अज्ञानाचं लक्षण आहे, अशी प्रतिक्रिया बापट यांनी दिली. ते एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
हेही वाचा- “…मग शरद पवार मेणाचा पुतळा आहेत का?” संजय राऊतांचा सवाल, नेमकं काय म्हणाले?
संघटनात्मक बहुमत आणि लोकप्रतिनिधींची संख्या आमच्याकडे जास्त आहे. त्यामुळे शिवसेनेच्या बाबतीत जो निकाल दिला. तोच निकाल आम्हाला द्या, या अजित पवार गटाच्या मागणीबाबत विचारलं असता उल्हास बापट म्हणाले, “हे तर माझ्या मते, अज्ञानाचं लक्षण आहे. शिवसेनेबाबत निवडणूक आयोगानं जो निकाल दिला होता, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरून निवडणूक आयोगाला योग्य तो अर्थ लावावा लागेल. त्यामुळे शिवसेनेच्या बाबतीत जो निकाल दिला, तोच निकाल आमच्या बाजुने द्या म्हणणं, हे कायद्याचं अज्ञान आहे.”
हेही वाचा- “अजित पवार गटाकडून जयंत पाटील मुख्यमंत्री होणार असतील, तर…”, सुप्रिया सुळेंचं विधान चर्चेत
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तासंघर्षावरील सुनावणीत होणाऱ्या विलंबावर भाष्य करताना उल्हास बापट पुढे म्हणाले, “माझ्यामते शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निकाल दोन ते तीन महिन्यात लागणं आवश्यक होतं. पण दुर्दैवाने आताच याला चार महिने झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची तर आताच सुनावणी सुरू झाली आहे. त्यामुळे कदाचित पुढच्या निवडणुका होईपर्यंत हे लांबत राहील. उशिरा मिळालेला न्याय हा एकप्रकारे अन्याय असतो. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय आणि विधानसभा अध्यक्षांकडून जो विलंब लागतो, तो अक्षम्य आहे, असं माझं व्यक्तिगत मत आहे.”