विधान परिषदेच्या दहा जागांसाठी एकूण ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आज सकाळी नऊ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. मतदानाची वेळ संपण्यापूर्वी १० मिनिटं आधीच सर्व आमदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. या निवडणुकीत एकूण २८५ आमदारांनी मतदान केलं आहे. मतदानानंतर आता निकालाकडे सर्वांचे डोळे लागले असून ५ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. ६ वाजेपर्यंत निकाल लागण्याची शक्यता आहे.
दहाव्या जागेसाठी काँग्रेसचे भाई जगताप आणि भारतीय जनता पार्टीचे प्रसाद लाड यांच्यात चुरस पाहायला मिळणार आहे. महाविकास आघाडीचे सहाही उमेदवार निवडून येतील, असा विश्वास मविआच्या नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. तर आमचे पाचही उमेदवार निवडून येतील असा दावा भाजपाकडून केला जात आहे. कोणाचा उमेदवार निवडून येईल, हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.
दुसरीकडे, भाजपाच्या आमदार मुक्ता टिळक यांनी स्वतः मतदान न करता दुसऱ्याकडून मतदान करून घेतल्याने त्यांच्या मतदानावर आक्षेप घेण्यात आला आहे. निवडणूक प्रतिनिधींकडे याबाबतची तक्रार करण्यात आली आहे. याबाबतची माहिती काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
मुक्ता टिळक सध्या आजारी असून त्यांना कर्करोगाचं निदान झालं आहे. आजारी असताना देखील त्या मतदान करण्यासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांनी स्वत: मतदान न करता दुसऱ्यांकडून मतदान करून घेतलं आहे. त्यामुळे निवडणुकीच्या नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला असून याची तक्रार निवडणूक प्रतिनिधींकडे दिली आहे. त्यामुळे राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेचा निकाल लागण्यास विलंब होण्याची शक्यता आहे.