विधानपरिषद निवडणुनकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात जोरदार राजकीय घडामोडी सुरू आहेत. जवळपास सर्वच पक्षांकडून आपल्या उमेदवारांचा अर्ज दाखल केला जात आहे. आज भाजपाने आपल्या अधिकृत पाच उमेदवारांपैकी एक असलेल्या उमा खापरे यांचा अर्ज दाखल केला, याचसोबत माजीमंत्री सदाभाऊ खोत यांनी देखील अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला, ज्यास भाजपाने समर्थन दिले आहे. हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना माहिती दिली.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “भाजपाच्या केंद्रीय संसदीय बोर्डाने राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांच्या नेतृत्वाखाली पाच अधिकृत उमेदवार घोषित केले. यापैकी उमा खापरे यांचा उमेदवारी अर्ज आम्ही आज भरला आहे. या व्यतिरिक्त भाजपाने शेतकऱ्यांचे नेते माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचा देखील अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे. सदाभाऊ खोतांच्या उमेदवारीला भाजपाचं समर्थन आहे. त्यामुळे पाच अधिकृत आणि एक अपक्ष अशा सहा जागांसाठी भाजपा प्रयत्न करणार आहे. तसेच, उर्वरीत चार अर्ज उद्या दाखल केले जाणार आहेत.”
तसेच, “भाजपाचे अधिकृत उमेदवार विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री राम शिंदे, राज्याचे संघटन सरचिटणीस श्रीकांत भारतीय, राज्य महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड आणि या व्यतिरिक्त सदाभाऊ खोतांच्या अपक्ष उमेदवारीला भाजपाने समर्थन दिलं आहे.” असं यावेळी चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितलं.
याचबरोबर, “सदाभाऊ खोत विशेषता एक प्रचंडं शेतकऱ्यांमधलं लोकप्रिय नेतृत्व आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये देखील, सदाभाऊ आणि गोपीचंद पडळकर यांनी त्या आंदोलनात प्रत्यक्ष १५ दिवस आझाद मैदानातील उपोषणात सहभाग नोंदवला होता. त्यामुळे शेतकरी असो किंवा या राज्यातील अन्याय झालेला नागरिक असो यासाठी भांडणाऱ्या सदाभाऊंना आमदार सद्सद्-विवेकबुद्धीला स्मरून मतदान करतील. पाचव्या जागेचा मुद्दा, त्या पाचव्या जागेसाठी आवश्यक मतं ही लोकप्रतिनिधी देतील आणि भाजपाचे पाच आणि अपक्ष पुरस्कृत सहावा असे उमेदवार या निवडणुकीत विजयी होतील.” असा विश्वास देखील चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.