विधान परिषद निवडणूक जळगाव
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या जळगाव विधान परिषद निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची नाराजी भाजप उमेदवाराला त्रासदायक ठरू नये, याची पुरेपूर व्यवस्था प्रमुख विरोधी पक्षांच्या आश्चर्यकारक माघारीतून आधीच करण्यात आल्याचे अधोरेखित झाले आहे. या निमित्ताने जळगावमधील खडसेंची राजकीय सद्दी मोडून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना रसद पुरविण्यासाठी धुरीणांची धडपड सुरू आहे. नाराज खडसेंची निवडणुकीतील भूमिका गुलदस्त्यात असली तरी त्यांना फारसे काही करता येणार नाही, अशी रणनीती आधीच आखण्यात आली आहे. धोका टाळण्यासाठी रिंगणात प्रमुख राजकीय पक्षांचा एकही उमेदवार नसणे, हे त्याचे ठळक उदाहरण. असे असले तरी ही निवडणूक अविरोध न होणे हे एक प्रकारे खडसेंचे यश असल्याचे मानले जात आहे.
जळगाव जिल्हा भाजपात खडसे आणि महाजन यांच्यातील वितुष्ट सर्वश्रुत आहे. पुण्यातील जमीन खरेदी प्रकरणात मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागलेल्या खडसेंकडे पक्षाने दुर्लक्ष केले. तीन महिन्यात चौकशी पूर्ण करण्याचे आश्वासनही हवेत विरले. यामुळे खडसेंची अस्वस्थता वारंवार उफाळत असली तरी तिला काडीमात्र किंमत न देण्याचे धोरण दुसऱ्या गटाने ठेवले आहे. त्याची प्रचीती विधान परिषद निवडणुकीच्या तिकीट वाटपात आली. खडसेंनी सुचविलेल्या विद्यमान आमदार गुरुमुख जगवानी यांना उमेदवारी नाकारत महाजनसमर्थक चंदू पटेल यांना उमेदवारी दिली गेली. पक्षाचा क्रियाशील सदस्य नसलेल्या बांधकाम व्यावसायिकाला उमेदवारी देऊन भाजपने नवीन पायंडा पाडल्याची टीका खडसेंनी केली. यामुळे महाजन आणि पर्यायाने मुख्यमंत्री गट अधिक सावध झाला.
राष्ट्रवादीची अखेरच्या क्षणी माघार
स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजप व राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. विरोधी पक्षातून प्रबळ उमेदवार समोर आल्यास त्यास नाराज गटाकडून रसद पुरविली जाण्याची शक्यता लक्षात घेत राष्ट्रवादीचा उमेदवारच रिंगणात राहणार नाही याची व्यवस्था करण्यात आली. राष्ट्रवादीचे उमेदवार माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी अखेरच्या क्षणी माघार घेतली. राष्ट्रवादी नेतृत्वाशी चर्चा करून भाजपच्या धुरीणांनी ते घडवून आणल्याचे सांगितले जाते. जिल्ह्य़ात काँग्रेसची तोळामासा अवस्था आहे. त्यांना ही जागा लढविण्यात रस नव्हता. काँग्रेस, शिवसेना, खान्देश विकास आघाडीसह १९ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे रिंगणात भाजप विरोधात सात अपक्ष उमेदवार आहेत. खरे तर ही निवडणूक अविरोध व्हावी असा महाजनांचा प्रयत्न होता. अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न करूनही अपक्षांचे ‘समाधान’ न झाल्यामुळे निवडणूक होत आहे. मागील निवडणूक खडसेंनी अविरोध घडवून आणली होती. सर्वाचे मतैक्य घडवत जगवानी विजयी झाले होते. महाजन यांचाही तोच प्रयत्न होता. परंतु, त्यात त्यांना यश मिळणार नाही अशी खेळी अपक्षांच्या मदतीने खेळली गेली. त्यामागे नाराज खडसे गट असल्याचे सांगितले जाते. मागील काही निवडणुकींचा आढावा घेतल्यास विधान परिषद निवडणुकीत आर्थिक उलाढाल अपरिहार्य ठरली आहे. यावेळी जिल्ह्य़ातील १३ नगरपालिकांच्या निवडणुका होत असल्याने सर्वपक्षीय उमेदवारांच्या खर्चाची बेगमी करण्याकडे रोख आहे. आर्थिक दृष्टीने सक्षम उमेदवाराला रिंगणात उतरवत भाजपने कुठे कमी पडणार नाही याची दक्षता घेतली. उमेदवार निवड प्रक्रियेवर खडसेंनी बोट ठेवल्याने ही निवडणूक गांभीर्याने घेऊन महाजन गटाने सर्व आघाडय़ांवर व्यूहरचना करण्यावर लक्ष केंद्रित केले. जळगावच्या राजकारणावर प्रदीर्घ काळापासून वर्चस्व राखणाऱ्या खडसेंच्या खच्चीकरणाचा एककलमी कार्यक्रम राबविला जात आहे. महाजन गटाची ताकद अजमावण्यासाठी खडसेंना बाजूला ठेवून सर्वपक्षीयांची मोट बांधण्याचा अनोखा प्रयोग या निवडणुकीनिमित्त करण्यात आल्याचे दिसत आहे.