राज्यातील विधान परिषद निवडणुकीसाठी अवघे काही तास शिल्लक राहिलेले असताना, एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसने ऐनवेळी आपला उमेदवार बदलला असून, आता छोटू भोयर यांच्या ऐवजी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांनी पाठिंबा जाहीर केल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे काँग्रेसने तसं पत्रक देखील काढल आहे. तर, विधानपरिषदेचे अगोदरचे उमेदवार भोयर यांना मात्र या निर्णयाबद्दल काहीच कल्पना नव्हती, अशी देखील माहिती समोर आली आहे.

काँग्रेसकडून उमेदवार बदलला जाणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. त्यानंतर काँग्रेसने आता प्रत्यक्ष तसा निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे. तर, काँग्रेसकडून घेण्यात आलेल्या निर्णयानंतर छोटू भोयर यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीत सहापैकी चार मतदारसंघात निवडणूक बिनविरोध झाली. विदर्भातील अकोला नागपूर या ठिकाणी मात्र महाविकास आघाडी विरुद्ध भाजप यांच्यात सामना रंगत आहे. 

काँग्रेसकडून काढण्यात आलेलं पत्रक –

“ नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने पक्षातर्फे डॉ. रविंद्र भोयर यांना उमेदवारी जाहीर केली होती. या निवडणुकीसाठी उद्या १० डिसेंबर रोजी मतदान होत आहे. मात्र, आता निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात डॉ. रविंद्र भोयर यांनी ही निवडणूक लढवण्यासाठी असमर्थता दर्शविल्याचे समजते. त्यामुळे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मान्यतेने तसेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार मंगेश सुधाकर देशमुख यांना काँग्रेस पक्षातर्फे पाठिंबा जाहीर करण्यात येत आहे. तरी या निवडणुकीतील मतदान करणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या सर्व सदस्यांना तसेच महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना या संदर्भात माहिती देण्यात यावी.” , असं पत्रक काँग्रेसकडून काढण्यात आलेल्या पत्रकात म्हटलेलं आहे.

…पक्षाला जर असं वाटत असेल की माझ्या ऐवजी मंगेश देशमुख हे निवडणूक जिंकू शकतात, तर… –

काँग्रेसकडून ऐनवेळी घेण्यात आलेल्या या निर्णयानंतर एबीपी माझाशी बोलताना रमेश उर्फ छोटू भोयर यांनी सांगितले की, “मलाही ते पत्र आता मिळालेलं आहे. मी ते पत्र वाचत आहे, त्यामुळे पक्षाने जर निर्णय घेतला आहे. त्या निर्णयाला विरोध करण्याचं माझं काही कारण नाही. कारण, संसदीय बोर्डाने मला उमेदवारी देऊ केली होती. मी आज सहा वाजेपर्यंत प्रचारातच होतो, अनेक मतदरांच्या संपर्कात होतो. पण पक्षाने जर आता यावेळी निर्णय घेतलेला आहे. तो जरी माझ्या बाजूने नसला, तरी पक्षाला जर असं वाटत असेल की मंगेश देशमुख हे निवडणूक जिंकू शकतात, माझ्या ऐवजी तर त्या निर्णयला विरोध करण्याचं काही कारण नाही. माझ्याशी कुणी चर्चा केली नाही. मी कोणताही आरोप करणार नाही. कारण, काँग्रेस पक्षात येऊन मला जेमतेम १५ दिवस झालेले आहे. त्यामुळे त्यांनी जे मूल्यमापन केलेलं असेल, त्या मूल्यमापनाच्या आधारावर त्यांनी जर एखादा निर्णय घेतलेला असेल, तर त्या निर्णयाच्या विरोधात जाण्याचं माझं काही कारण नाही. मी दुपारपर्यंत प्रदेशाध्यक्षांशी बोलत होतो, तेव्हा त्यांनी देखील सांगतिलं की असा कोणताच विषय नाही. आता संध्याकाळी जर हा विषय आलेला असेल, तर त्यावर मी माझी प्रतिक्रिया एवढीच देईन की पक्षाचा जो काही निर्णय असेल, त्या निर्णयाविरोधात मी जाणार नाही. या निर्णयाने मला वाईट नक्की वाटेल, परंतु भाजपातून काँग्रेसमध्ये येण्याच्या माझ्या निर्णयावर मला पश्चाताप नाही.”

Story img Loader