महाराष्ट्राच्या अनेक भागात डान्सबार, मटकासह विविध अवैध धंदे सुरू आहेत. शासनाने तातडीने नवीन कायदा करून डान्सबार बंद करण्यासह अवैध व्यवसाय बंद करावे, या मागणीसाठी राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील (आबा) यांच्या पत्नी आमदार सुमन पाटील यांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर मंगळवारी उपोषण केले. या आंदोलनात सभागृहाचे ज्येष्ठ नेते आमदार गणपतराव देशमुख, जयंत पाटील, अजितदादा पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी सहभाग घेतला.
सुमन पाटील म्हणाल्या, आर. आर. पाटील यांनी महाराष्ट्राच्या विकासाकरिता बरीच कामे केली आहेत. त्यांनी केलेल्या काही कामाला नवीन सरकार गती देत नसल्याचे दिसते. यावर्षी मिरज पूर्व भाग, कवठेमहाकाळ, तासगाव, जद, सांगोला या भागांसह बऱ्याच भागात भीषण दुष्काळ पडला आहे. तेव्हा शासनाने तातडीने म्हसाळा योजना सुरू करण्याची गरज आहे. योजनेतील शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करून हे बिल या योजनेतील खर्चात विशिष्ट पद्धतीने समाविष्ट करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या ७/१२ वर शासनाकडून पाणीपट्टी कराची थकबाकी दाखवल्या जाते. त्याने शेतकऱ्यांना त्रास होत असल्याने ती नोंद बंद करण्याची गरज आहे. राज्यात डान्सबारमुळे बरीच कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत.
शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अभ्यास करून नवीन कायदा करून हा प्रकार बंद करण्याची गरज आहे. राज्यात बऱ्याच भागात मटकासह अवैध व्यवसाय होताना दिसतात. हाही प्रकार शासनाने तातडीने बंद करून दोषींवर कारवाई करण्याची गरज आहे.
आंदोलनात सभागृहाचे ज्येष्ठ नेते आमदार गणपतराव देशमुख यांच्यासह बरेच सदस्य सहभागी झाल्याने विधिमंडळ कामकाजमंत्री गिरीश बापट यांनी त्वरित आंदोलन स्थळ गाठले. त्यांनी गणपतराव देशमुख यांच्यासह सुमन पाटील यांना या विषयावर तातडीने विधानसभा अध्यक्षांच्या दालनात संबंधित विभागाच्या मंत्र्यांसह सचिवांची बैठक लावण्याचे आश्वासन दिले.
अजितदादा पवार यांनी बैठकीसाठी तारीख व मुद्दे निश्चित करण्याची विनंती करताच १६ डिसेंबरची तारीख निश्चित करून मंत्र्यांनी स्वत: विषय सोडवण्याकरिता मध्यस्थी करण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या शब्दाला मान देऊन उपोषण सोडून आंदोलन स्थगित केले.

Story img Loader